Amit Shah - Fadnavis Eknath shinde .jpg Sarkarnama
मुंबई

Shivsena Vs BJP : शाह,बावनकुळेंचं 'ते' वक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी; म्हणाले, शिंदेंनी आमदारांसह उठाव केला नसता, तर आज भाजपा...'

Deepak Kulkarni

Mumbai News : एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या घडामोडींनी वेग पकडला आहे. लवकरच जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जागावाटपाबाबत युती आणि आघाडीच्या नेतेमंडळींकडून दावे - प्रतिदावे केले जात आहे. तसेच अनेक मतदारसंघावरुन कलगीतुरा रंगल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या एका वक्तव्यावरुन भाजप आणि शिवसेनेत खटके उडाल्याचे पाहायला मिळत आहे. शाह यांच्यासोबतच्या गुरुवारी(ता.17)होत असलेल्या दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीच्या जागावाटप फायनल होणार असल्याची चर्चा आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीत शाह यांनी मोठं विधान केलं होतं. यावेळी शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आमच्या नेत्यांनी त्याग केला, आता तुम्ही त्याग करा,असे सूचक विधान केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्या वृत्ताला दुजोरा दिल्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली.

पण महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात खुलासा करत ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र,तरीही शिवसेनेच्या आमदारांनी अमित शाहांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त करत भाजपच्या जिव्हारी लागेल अशा प्रतिक्रिया खासगीत उमटताना दिसून येत आहे.

...तर आज भाजपा विरोधी बाकांवरच बसलेले असते!

शिवसेनेचे आमदार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याग करण्यासाठी सूचित करणाऱ्यांनी शिवसेनेच्या धाडसी आणि क्रांतीकारक ऐतिहासिक उठावाची जाणीव ठेवावी.शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह धाडसी पाऊल उचलून उठाव केला नसता तर आज भाजपा आमदार विरोधी बाकांवरच बसलेले असते असा खोचक टोलाही शिवसेना आमदारांनी लगावला आहे.

...या धाडसी उठावाची बावनकुळेंनी जाणीव ठेवावी!

त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी केली होती. महाविकास आघाडीच्या या षडयंत्रासंदर्भात स्व:ता भाजपच्या जेष्ठ नेत्यांनीही अनेकदा जाहीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या धाडसी उठावाची बावनकुळे यांनी जाणीव ठेवावी अशी चर्चा शिवसेना आमदारांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत. अशा वातावरणात कोणताही वाद नको, म्हणून शिवसेना आमदार कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात खुलासा करत ही माहिती खोटी असल्याचं स्पष्टं केलंय. मात्र, बावनकुळेंच्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेच्या आमदारांमधील खदखद थांबायला तयार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT