Advocate Rakesh Kishore being escorted out of the Supreme Court after an attempted shoe-throw at CJI bhushan Gavai. Sarkarnama
मुंबई

CJI gavai : 'हिंदूचे राज्य म्हणजे अडाणी, धर्मांधांचे राज्य नव्हे, अंधभक्तांचे विष्णू वेगळे...', सरन्यायाधीश बूटफेक प्रकरणावरून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

shoe attack on cji gavai : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी राकेश किशोर नावाच्या वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 08 Oct : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी राकेश किशोर नावाच्या वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.

अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. भारताच्या जनतेचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. खास करून देशावर मोदी राज आल्यापासून आपल्या न्यायव्यवस्थेचे जे अधःपतन झाले ते पाहून रामशास्त्री स्वर्गात अश्रू ढाळत असतील. ते काहीही असले तरी आजही भारतीय जनतेसाठी सुप्रीम कोर्ट हाच एकमेव आशेचा किरण आहे.

म्हणूनच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत जे अघटित घडले त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच, असं म्हणत सामनातून सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध केला आहे. हा निषेध करताना सामनामधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. सामनात लिहिलं की, 'सनातन धर्माचा अपमान झाल्याचे सांगत एका वकिलाने सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टाच्या कार्यवाहीदरम्यान हे घडले.

सरन्यायाधीश गवईंपर्यंत तो माथेफिरू वकील पोहोचू शकला नाही. त्यामुळे अनर्थ टळला. देशातील न्यायव्यवस्था सडली आहे. तेथे खरा न्याय मिळणे कठीण झाले आहे. भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी न्यायासनापर्यंत पोहोचली आहे. न्यायालये मोदी-शहांच्या दबावाखाली काम करीत असल्याने लोकशाही, संविधानावर रोज राजकीय हल्ले सुरू आहेत.

या कारणासाठी एखाद्या राष्ट्रप्रेमीने असा संताप व्यक्त केला असता तर समजण्यासारखे आहे, पण सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत वकिलाने सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. अनेक सरन्यायाधीशांनी निवृत्तीनंतर मोदी सरकारची नोकरी पत्करली आहे. कुणी राज्यपाल बनले, कोणी एखाद्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.

न्याय विकण्याचा हा प्रकार जोडे मारण्याच्या लायकीचा असताना सनातनच्या नावाने शिमगा करीत सरन्यायाधीश गवईंवर राग काढला गेला. सरन्यायाधीश गवई यांनी म्हणे भगवान विष्णूवर एक भाष्य केले. त्यामुळे या सनातनी वकिलाच्या भावना दुखावल्या. गवई यांनी सप्टेंबर महिन्यात मध्य प्रदेशातील खजुराहो येथील एका खंडित मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची आणि भंग झालेली मूर्ती बदलून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावली.

याचिकाकर्ता वाद करू लागला तेव्हा सरन्यायाधीश गवई म्हणाले, ‘‘आता तुम्हीच ईश्वराकडे जा आणि काही करण्यास सांगा. आपण भगवान विष्णूचे परमभक्त आहात. तेव्हा प्रार्थना करा आणि ध्यान करा, पण इथे कायद्याप्रमाणेच न्याय होईल.’’ काही जणांना हे भाष्य भावना दुखावणारे वाटले तेव्हा कोणताही आडपडदा न ठेवता सरन्यायाधीश गवई यांनी खेद व्यक्त केला.

इतके होऊनही या माथेफिरू वकिलाने असे घाणेरडे कृत्य केलेच. आता सनातन धर्म म्हणून नक्की कोणत्या देवाचा अपमान झाला? स्वतः नरेंद्र मोदी हे ‘नॉन बायोलॉजिकल’ पद्धतीने जन्माला आले. त्यामुळे ते मनुष्यप्राणी नाहीत. हे मोदी स्वतःच सांगतात. मोदींचे भक्त त्यांना विष्णूचा तेरावा अवतार मानतात. त्यामुळे हिंदू धर्मीयांचे भगवान विष्णू वेगळे व भाजपमधील अंधभक्तांचे विष्णू अवतार वेगळे, असा टोलाही सामनातून लगावला आहे.

तर सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे. संविधान बदलाचा कट हाणून पाडल्यामुळे संविधानावर बूट फेकणे ही भाजप आणि संघ विचाराची विषवल्ली आहे. हे कृत्य निंदनीय आणि बेशरमपणाचे आहे. कोणताही खरा हिंदू असे बेशरम कृत्य करण्यास धजावणार नाही. गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील सनातनी हिंदू धर्माचा मारेकरी आहे.

याच सनातन्यांनी संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, महात्मा फुले यांच्यावर शेण टाकले होते आणि याच सनातन्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती. हेच सनातनी गोडसे जयंती साजरी करतात व गांधींवर आजही गोळ्या झाडून विकृत आनंद व्यक्त करतात. याच सनातन्यांनी पुण्यात मराठा साम्राज्याचा ध्वज उतरवून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला.

याच सनातन्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यास व स्वातंत्र्यानंतर तिरंगा फडकवण्यास विरोध केला. गेल्या दहा वर्षांत भारताची लोकशाही संकुचित आणि धर्मांध बनली ती याच सनातन्यांमुळे. हिंदूचे राज्य म्हणजे अडाणी, धर्मांधांचे राज्य नाही. हिंदूंचे राज्य म्हणजे अंधभक्तांचे राज्य नाही, पण भारतीय जनता पक्षाने धर्मांध, अंधभक्त म्हणजेच हिंदुत्व हा विचार लोकांत रुजवला व राज्य केले. सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर हा अशाच अंधभक्तांचा बाप दिसतो, असा हल्लाबोल सामनामध्ये केला आहे.

तर सरन्यायाधीश गवई यांनी आतापर्यंत उत्तम काम केले. त्यांना कालावधी कमीच मिळाला. त्यांनी या काळात भरपूर व्याख्याने दिली, भाषणे केली. ते संयमाने वागले. ते संघ परिवाराच्या जाळ्यात अडकले नाहीत. तरीही ते सनातन्यांचे लक्ष्य ठरले. याच सनातन्याने सरन्यायाधीश गवईंवर मात्र बूट फेकण्याचा प्रयत्न केला. गवईंनी त्या बूटमारणाऱ्याला माफ केले व त्याचा जप्त केलेला बूटही परत केला. ‘या बुटाचा सदुपयोग करा व ज्यांची जोडे खायची लायकी आहे, त्यांनाच मारा’ असेच सरन्यायाधीश गवईंना सुचवायचे असावे, असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT