Pune News, 08 Oct : पुणे काँग्रेसमधील गटबाजी ही काही नवीन नाही. फार पूर्वीपासून पुण्यातील काँग्रेस ही विविध गटांमध्ये विभागलेली आहे. त्यामुळे नियुक्ता असो वा निवडणुकांची तिकीट वाटप, अथवा कोणताही संघटनात्मक निर्णय असो हे गट सातत्याने एकामेकांसमोरच उभे ठाकलेले पाहायला मिळतात.
मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गटबाजी बाजूला ठेवून एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून ही गटबाजी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेसचे दोन गट आमने-सामने आले आहेत.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्थानिक संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून काही नियुक्त्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या नियुक्त्यांमध्ये संजय बालगुडे, अविनाश बागवे, सुनील मलके आणि भाऊसाहेब आसबे यांची नावं आहेत.
या चार जणांवर प्रत्येक प्रभागातून एक प्रमुख निवडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेमध्ये येणाऱ्या 165 प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात एक प्रमुख आणि त्याला मदत म्हणून एक व्यक्ती निवडण्यात येणार आहे. यातून तयार होणाऱ्या टीमला आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिबीर घेऊन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबतचे मेसेज नियुक्ती झालेल्या नेत्यांकडून सोशल मीडियावर देखील शेअर केले जात आहेत. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'काल संपन्न झालेल्या शिबिरात, प्रदेश अध्यक्ष यांच्या सोबत चर्चा झाल्यानुसार, आगामी काळात होणाऱ्या मनपा निवडणूक व संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून शिबिर घेण्याचे नियोजित केले आहे.
त्यासाठी व पक्ष संघटन वाढवण्यासाठी पुणे शहरातून प्रत्येक प्रभागात एक प्रमुख व्यक्तींचे नाव निश्चित करण्याचे ठरवले आहे. जे जे यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे, फोन नंबर, पत्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ठरवलेल्या व्यक्तींकडे द्यावीत.' हे मेसेज आणि नियुक्ता वादाचं कारण ठरत आहेत. कारण काँग्रेसच्या एका गटाकडून ह्या नियुक्त्या आणि मेसेज फेक असल्याचं सांगण्यात येत आहे.
मनपा निवडणूक संदर्भात प्रभागा प्रमाणे एका प्रमुखाचे नाव द्या अशी पोस्ट फिरत आहे, अशी कुठलीही पद्धत काँग्रेसमध्ये नसते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून शहर काँग्रेस कमिटीला ईमेल येतो आणि त्यानंतरच अधिकृत नावे ठरतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की प्रदेश काँग्रेस कमिटीकडून नाव आल्यानंतर आपण त्यांना संपर्क करावा.
फेक मेसेजपासून सावध रहा, अशा नियुक्तीचे अधिकार शहर काँग्रेसला असतात. असं स्पष्टीकरण काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सरकारनामाशी बोलताना दिल आहे. त्यामुळे एक गट या नियुक्त्या योग्य असून त्या पद्धतीने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे नाव पाठवण्याची सूचना करत आहेत.
तर दुसरीकडून काँग्रेस शहराध्यक्ष मात्र या नियुक्त्या अधिकृतपणे आपल्याकडे आल्या नसल्याने जोपर्यंत अधिकृतपणे प्रदेश काँग्रेसकडून याबाबत कोणतीही सूचना येत नाही तोपर्यंत या नियुक्त्या ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे दोन गट आमने-सामने आले असून हा वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.