Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde News : क्षुल्लक बदलीवरून युतीत कुणी आव्हान देऊ नये; श्रीकांत शिंदेनी सांगितला मध्यम मार्ग

सरकारनामा ब्यूरो

Shivsena and BJP : नरेंद्र मोदी यांना २०२४ ला पंतप्रधान करण्यासाठी युतीत एकत्र काम करणे गरजेचे आहे. कल्याणमधून कुणी निवडणूक लढवायची याबाबत युतीतील वरिष्ठ नेते ठरवील. मात्र एखाद्या क्षुल्लक कारणावरून कुणी थेट उमेदवार ठरवण्याची भाषा करून आव्हान देऊ नये, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना नाव न घेता केले आहे. (Latest Marathi News)

भाजपच्या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी कल्याणचा उमेदवार भाजप ठरवेल असे स्पष्ट केले होते. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी मध्यम मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची बदली या कारणावरून युतीत मिठाचा खडा टाकण्याचे कुणी काम न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, "राज्यात युती सरकार चांगले काम करत आहे. मात्र कुठल्यातरी पोलीस अधिकाऱ्यावरून हे लोक ठराव करतात की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही. तेथील उमेदवार आम्हीच ठरवू. कुणी आव्हाने देण्याचे काम करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दहा महिन्यापूर्वी उचललेल्या पावलामुळेच आज चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. अशी आव्हाने विचारपूर्वक केली पाहिजे."

शिंदे यांनी युतीचे महत्वही यावेळी पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "युतीच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून काम करत आहे. आताही ५५ कोटी रुपयांचा निधी फक्त भाजपच्या नगरसेवकांना दिले. मला तर कुठलाही स्वार्थ नाही. मला सांगितले तर मी खासदारकीचाही राजीनामा देऊन पूर्णवेळ युतीचे काम करायला तयार आहे. आमचा शुद्ध हेतू नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आहे. त्यासाठी जीव तोडून काम करण्याची तयारी आहे."

श्रीकांत शिंदे यांनी यावेळी कुठल्याही पदाची लालसा नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. युतीमध्ये विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजिनामा द्यायला तयार आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना-भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू. "

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT