Sachin Ahir  Sarkarnama
मुंबई

Sachin Ahir : शिंदेंचे काही आमदार परत येण्याच्या तयारीत, ठाकरे गटाचे आमदार अहिर यांचा दावा !

Chaitanya Machale

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसनेनेत केलेल्या बंडामुळे शिवसेनेचे विभाजन होऊन दोन गट तयार झाले. लोकसभेच्या निकालानंतर शिंदे यांच्याबरोबर असलेले काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांना मिळालेल्या यशानंतर विधानसभेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शिंदे यांना सोडून पुन्हा ठाकरेंकडे जाण्याची तयारी काही आमदारांनी केली आहे. याला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी देखील दुजोरा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना चांगले यश मिळाले. महाराष्ट्रात भाजपच्या जागांमध्ये घट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्यानंतरही अनेक ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचा फटका पुढील तीन ते चार महिन्यांवर असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये, यासाठी आता शिंदे गटातील आमदारांनी सावध पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिंदे गटात पसरलेल्या अस्वस्थतेवर उद्धव ठाकरे गटाचे आमदार अहिर यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीमध्ये देखील शिंदे गटातील काही जणांनी आमच्याशी संपर्क साधला होता. लोकसभेसाठी तुम्हाला मदत करू, पण विधानसभेला संधी द्या, अशी त्यांची भूमिका होती. मात्र पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याकडे गेलेल्या आमदारांसाठी दरवाजे बंद केले असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगितले की सिट गेली तरी चालेल पण गद्दरांशी चर्चा नाही, असे अहिर म्हणाले.

लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या खासदारांमध्ये मंत्रीपदासाठी मोठी चढाओढ असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याच खासदारांचा असे म्हणणे आहे की, जी रसद आम्हाला द्यायला हवी होती ती योग्य दिली नाही. इतरांकडे लक्ष दिलं तसं आमच्याकडे दिलं नाही. आता तर मंत्रीपद कोणाला मिळावं याबाबत देखील त्यांच्यामध्येच मारामाऱ्या सुरू झाल्या असल्याचे अहिर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT