Eknath Shinde Latest News Sarkarnama
मुंबई

सत्ता स्थापनेचा मुहूर्त हुकणार असल्याने शिंदे गट बंड गुंडाळण्याच्या तयारीत?

बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदार आता लवकरच परतीच्या वाटेवर निघणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदार आता लवकरच परतीच्या वाटेवर निघणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. येत्या मंगळवारी असलेल्या अमावस्येच्या आतच सत्तास्थापनेसाठी मुहूर्त असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यात्मिक गुरुंनी सांगितले असल्याची चर्चा आहे. अमावस्येच्या आतच म्हणजे २८ जूनच्या आतच बंड यशस्वी करण्याचा एकनाथ शिंदे यांचा इरादा होता. मात्र, या मुहूर्ताच्या आतच सुरु झालेल्या वेगवान राजकीय कुरघोडीमुळे वेळ लागल्याने आता बंडखोर माघारी फिरणार, असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तसेच शिवसेना (ShivSena) नेतृत्व एवढी मोठ्या प्रमाणात झालेली फूट बघून हतबल होईल, हा कयास खोटा ठरला. उलट बंडखोर आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बंड आवरते घेण्याच्या मनस्थितीमध्ये सर्वच बंडखोर आमदार आले आहेत. फुटीर आमदारांना फक्त तीन दिवस बाहेर थांबण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज पाच दिवस झाल्यानंतरही सत्ता स्थापनेबाबत काहीच मार्ग दिसत नसल्याने या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यांच्यात कमालीची अस्वस्थता दिसत आहे. त्यातच दिवस लांबल्याने संयम सुटत चालला आहे. काही आमदारांमध्ये गुवाहाटी येथे जोरदार अंतर्गत वादावादी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यामध्येच शिंदे यांच्या अध्यात्मिक गुरूने त्यांना या अमावास्येच्या आतच राजयोग येणार असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळेच विधानपरिषद निवडणूक संपताच तातडीने सर्व आमदारांना मुंबई येथून विधानभवनातूनच सुरत येथे नेण्यात आले होते. मात्र, राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने सत्तेची समीकरणे बदलली. गुरूने दिलेला मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता स्वतः शिंदे सुद्धा परत फिरण्याच्या मनस्थितीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

गेले दोन दिवस एकनाथ शिंदे आमदारांना वारंवार संयमाचे आवाहन करीत आहेत. मात्र, मतदार संघातील वाढत्या असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे. कुटुंबीय धास्तावलेल्या मानसिकतेत आहेत. गद्दारीचा शिक्का, पैसे खाऊन विकले गेल्याचा आरोप होत, असून कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा प्रकारच्या व्यथा कुटुंबीय मांडत आहेत. त्यातच या सर्व आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे कुणाशी संपर्क साधायचा असेल, तर हॉटेलमध्ये असलेल्या ठराविक व्यक्तीला सांगूनच फोन करावा लागतो. त्यामुळेही हे आमदार त्रस्त झाले आहेत.

काही लोकांनी स्वत:ला चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी आपली दिशाभूल केली, अर्धवट माहिती दिली, आपल्याला फसविले गेले, वापरले जात आहे, ही भावना या बंडखोर आमदारांमध्ये वाढत चालली आहे. याच वैफल्यातून काल रात्री गुवाहाटीत जोरदार अंतर्गत वादावादी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT