Voting Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : 105 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा; आचारसंहिता लागू

या निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार या निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.

त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे:

ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)

परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा, गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.पोटनिवडणुकांसाठीही मतदानविविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. शिरोळ (6 अ), नागभीड (4 अ), जत (5 ब), सिल्लोड (12 अ), फुलंब्री (2 आणि 8), वानाडोंगरी ( 6 अ) आणि ढाणकी (12 आण 13) या नगरपरिषद/ नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT