डोंबिवली : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. माजी आमदार आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे ठाणे जिल्ह्यातील चर्चांना उधाण आले असून ठाणे जिल्ह्याची धुरा ही भोईर यांच्या खांद्यावर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिंदे आणि भोईर यांचे फारसे पटत नसल्याने भोईर गेल्या काही वर्षांपासून शांततेच्या भूमिकेत होते. ते पक्ष सोडतील अशी देखील चर्चा होती. मात्र राजकीय वारे बदलताच भोईर जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. ''मी आहे तिथेच आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे", असे स्पष्ट करत शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी आपले समर्थन उद्धव ठाकरे यांना जाहीर केले आहे. (Uddhav Thackeray, Subhash Bhoir Latest News)
शिंदेंनी बंड पुकारले असून त्यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. शिंदेंची ठाणे जिल्ह्यात ताकद असली तरी शिवसैनिक हे ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे गेल्या दोन दिवसांत पहायला मिळत आहे. त्यातच भोईरांची नुकतीच ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्याने शिवसेनेचा ठाणे जिल्ह्याचा पुढील चेहरा भोईर असणार या चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील राजन विचारे यांचे देखील नाव चर्चेत असून भोईर यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसते.
ज्याप्रकारे शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण हे मुद्दे घेऊन बंडखोरी केली असली तरी माजी आमदार सुभाष भोईर यांनी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे यांच्या सोबत काम केले असून त्यांचा पगडा भोईर यांच्या कामातून दिसला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, ग्रामीण भागातील भूमी पुत्रांचा पाठिंबा, नवी मुंबई विमानतळ नामकरण समिती मधील त्यांचा सहभाग या साऱ्या जमेच्या बाजू असल्याने त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला टक्कर देण्यासाठी 2014 मध्ये शिवसेनेने भोईर यांना उतरवून पूर्ण ताकदीने निवडून आणले होते. त्यानंतर भोईर यांनी कल्याण ग्रामीण विधासनसभा मतदारसंघातील गावांमध्ये रस्ते, गटारे, पायवाटा, पाणी योजना, गाव विकासाच्या योजना राबवून ग्रामस्थांना आपलेसे केले. भोईर यांच्या विकासकामांचा झपाटा पहाता पक्षातील वरिष्ठांना ते खूप लागले होते. भोईर यांनी मंत्रालयातून, जिल्हा महसूल विभागाकडून निधी मंजूर करून आणून काम सुरू केले की, त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेतील काही मंडळी फलकबाजी करून भोईर यांच्यावर बाजी मारण्याचा प्रयत्न करत होते. गावात सुरू झालेले विकास काम हे भोईर यांच्या प्रयत्नांतून सुरू झाले आहे हे माहीत असून देखील त्यांना कामाचे श्रेय न देता त्या विकासकामांचे श्रेय वरिष्ठ लाटत होते. यामुळे पक्षातील वरिष्ठ आणि भोईर यांच्यात धुसफूस सुरू होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भोईर यांचे नाव उमेदवारीसाठी पक्षाच्या यादीत अग्रक्रमावर असताना, खुद्द उद्धव ठाकरे यांनी भोईर यांना एबी फॉर्म दिला. भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्ह्यातील नेत्याच्या नाराजीमुळे व बालहट्टामुळे भोईर यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना कल्याण ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेत चलबिचल झाली. स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्या, बाहेरील उमेदवार येथे नको, अशी ओरड स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा नेत्यांनी धाक दाखवताच स्थानिकांना शांत रहावे लागले होते. अखेर सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी न बोलता जे करायचे ते काम केल्याने म्हात्रे यांना मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या पुढे पराभूत व्हावे लागले. ग्रामीण मतदारसंघाची बांधणी भोईर यांची आणि उमेदवार मात्र शहरी हे सूत्र पदाधिकाऱ्यांना पटलेच नाही. त्याची किंमत अखेर जिल्हा नेत्यांना मोजावी लागल्याचे दिसुन आले.
मी आहे तिथेच आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोबतच आहे”, असे स्पष्ट करत भोईर यांनी आपले समर्थन उद्धव ठाकरे यांना जाहीर केले आहे. “अन्य बंडखोरीच्या विषयावर आपणास काहीही बोलायचे नाही. फक्त मी आहे त्याच ठिकाणी आहे", अशी प्रतिक्रिया भोईर यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.