मुंबई

Vedanta Foxconn|पण त्याचवेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..; सुभाष देसाईंनी उघडले पत्ते

Vedanta Foxconn| २६ जुलै २०२२ रोजी फॉक्सकॉन च एक मोठ शिष्टमंडळ महाराष्ट्रात आलं होतं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक- आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून दबाव वाढल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवरच आरोप केले आहेत. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान माजी मंत्र सुभाष देसाई यांनी काही महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष वेधले आहे.

वाचा, काय म्हणाले सुभाष देसाई?

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातच होणार होता. यासाठी महाविकास आघाडी सरकारने जोरदार प्रयत्न केले होते. मे २०२२ मध्ये स्विज्झर्लंडमधील दावोस येथे जी वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची परिषद भरली होती याठिकाणी वेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांच्याशी चर्चा केली यावेळी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. अनिल अगरवाल यांनी महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांबाबत माहिती घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, आम्ही लवकरच याबाबत करार करु. पण त्याचवेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारचा होकार आम्हाला घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितलं आणि आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली,.

खरंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचा कोणताच संबंध नव्हता, त्यावेळी या प्रकल्पासाठी फक्त महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये स्पर्धा होती. या प्रकल्पासाठी गुजरातची कुठे नामोनिशाणही नव्हतं. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये या स्पर्धेत होती. त्यावेळी गुजरातची चर्चाही नव्हती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुजरातचा कुठे उल्लेखही नाही आणि अशा ठिकाणी हा प्रकल्प नेला जातोय हे शंकास्पद आहे.

२४ जुन २०२२ ला मी एका शिष्टमंडळासह दिल्लीत गेलो होतो. तिथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग ल्यु भेटले. याभेटीत तळेगावर चर्चा झाली. तेथील पाणी आणि जमीनीबाबत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी मनुष्यबळाबबातही चर्चा केली. आम्ही त्यांना मनुष्यबळाबाबतही माहिती दिली. या भेटीनंतर आता हा प्रकल्प आपल्याकडे येणार याबाबत आम्हाला चांगली खात्री पटली होती. पण जुनमध्ये आमचं सरकार गेलं.

पण २६ जुलै २०२२ रोजी फॉक्सकॉन च एक मोठ शिष्टमंडळ महाराष्ट्रात आलं होतं. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यसरकारकडून एक अधिकृत पत्रक जारी करुन वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या भागीदारीतून एक लक्ष ६६ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव आलेला आहे. यातून दोन लाख रोजगार निर्माण होतील. पश्चिम महाराष्ट्रातील तळेगाव आणि विदर्भातील बुटीबोरी या ठिकाणी या प्रकल्प उभारले जातील. विशेष म्हणजे या प्रकल्पाला केंद्र सरकारचे सहकार्य लाभत आहे, अशी पुष्ठीही याला देण्यात आली होती. हे राज्य सरकारच्या २६ जुलैच्या अधिकृत पत्रकातही जाहीर करण्यात आलं आहे.

असे असताना विद्यमान राज्य सरकार महाविकास आघाडीवर हे खापर फोडायला निघाले आहेत, २६ जुलैच्या या चर्चेत किंवा त्यानंतरच्या काढलेल्या पत्रकात महाविकास आघाडी सरकार या प्रकल्पाबाबत निष्क्रिय होती, आधीच्या सरकारकडून काही त्रुटी राहिल्या, काही कमतरता राहिली असा उल्लेख का केला नाही, असा सवाल सुभाष देसाई यांनी केला आहे.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मोठे ढोल पिटले गेले, पण महाविकास आघाडी कुठे कमी पडली त्याबाबत एक शब्दही त्यांनी काढला नाही. पण आज महाविकास आघाडीचे प्रयत्न तोकडे पडले, असे म्हणायला मुख्यमंत्र्यांना साक्षात्कार कसा झाला, कोण विश्वास ठेवणार तुमच्यावर. पण आता यावर आरोप प्रत्यारोप करुन फायदा नाही. उपमुख्यमंत्र्यांचे केंद्र सरकारशी असणारे संबंध जगजाहीर आहेत, त्यामुळे त्यांनी हा निसटुन चाललेला प्रकल्प महाराष्ट्रा आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत. असे आवाहन मी करत आहे.

इतकचं नाही तर मोठ्या रोजगाराची संधी असणारा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी जर आम्हाला काही करता येण्यासारख असेल तर शिवसेना सहकार्य करण्यास तयार आहे. असही देसाईंनी म्हटले आहे. पण राज्यसरकार मान खाली घालून शांत बसणार, वेदांता गुजरातला नेण्याबद्दल ब्र ही काढणार नाही, याची खात्री केंद्र सरकारला झाली आहे. पण यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. अशी खंतही सुभाष देसाई यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT