Sunetra Pawar  Sarkarnama
मुंबई

NCP Politics : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या नोटिशीमागे कोणाचा ब्रेन? सच्चिदानंद सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न?

Sunetra Pawar Legal Notice Row : अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक वाटचाल सुरू असतानाच राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित करणारी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 14 Jul : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदालाच आता कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या निवडीविरोधात कायदेशीर नोटीस बजावल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले असून, पक्षात नेमके काय सुरू आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक वाटचाल सुरू असतानाच राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित करणारी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

त्यामुळे ही केवळ वैयक्तिक भूमिका आहे की त्यामागे पक्षातील काही प्रभावशाली नेत्यांचे पाठबळ आहे? याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सच्चिदानंद सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये थेट नाव न घेता पक्षातील काही नेत्यांवर निशाणा साधला.

"राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनीच! विरोध करणारा सचिदानंद बाबा कुणाच्या जिवावर नोटीस पाठवतोय हे शोधावेच लागेल. राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळत आहे आणि या नेतृत्वाची वाटचाल दादांच्या विचारांवर उत्तम होत आहे. हे पक्षातील अतृप्त आत्म्यांना कसे सहन होईल? पण झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर अजितदादांचे तळागाळातील कार्यकर्ते या झारीतील शुक्राचार्यांना तळागाळात नेऊन टाकतील," असे मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मिटकरी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी उल्लेख केलेले 'अतृप्त आत्मे' आणि 'झारखंड कनेक्शन' नेमके कोणाकडे निर्देश करतात, यावर राजकीय चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात काही प्रमाणात अस्वस्थता असल्याचे त्यांनी मान्य केले. संघटनात्मक पातळीवर काही सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्या दिशेने योग्य वेळी पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, सुनेत्रा पवार यांना पाठविण्यात आलेल्या कायदेशीर नोटिशीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे पटेल यांनी ठामपणे सांगितले. "सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड पक्षाच्या घटनेनुसार झाली आहे. त्यामुळे या नोटिशीला फारसे महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. नोटीस येण्यापूर्वी पक्षातील काही संघटनात्मक सुधारणांबाबत आपण वैयक्तिक मत व्यक्त केले होते.

मात्र, त्या मताचा आणि या कायदेशीर नोटिशीचा कोणताही संबंध नसल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी सच्चिदानंद सिंह यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यामागे नेमके कोण आहे?सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न कोण करतंय? याबाबतच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT