Beed News, 14 Jul : राज्यातील दूध भेसळ आणि दूध संकलन प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या विषयावर बोलताना नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले.
त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांना थेट इशारा दिला आहे. सभागृहात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यातील एका आमदाराची पत्नी डेअरी चालक आणि दूध संकलन संस्थांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
तसेच मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांनाही निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित महिला संपादकांनाही फोन करून दबाव आणत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीही गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती कोण आहे आणि ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात कोणत्याही आमदाराचे नाव घेतले नव्हते. मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांनी हे आरोप आपल्यावर ओढावून घेतले आहेत.
जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सुरेश धस यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. "जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी सहज डिवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हालाही नीट सोडणार नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे नाही," असा इशारा त्यांनी दिला.
धस पुढे म्हणाले, "तुम्हाला पाहून इतर लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. देवाने तुम्हाला जेवढे डोकं दिले आहे, त्यापेक्षा एक टक्का जास्त आम्हाला दिले आहे. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचत असाल, तर आम्हीही तुमच्या भागात येऊन तुम्हाला डिवचू."
याचवेळी सुरेश धस यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रत्यारोप करत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील 'जिओ टॅगिंग'च्या जीआरचा मुद्दा उपस्थित केला. त्या निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 'महालक्ष्मी' संस्था नेमकी कोणाची आहे.
तिची नोंदणी कोणाच्या नावावर आहे आणि त्या संस्थेत कोणाचा किती वाटा आहे, याची माहिती पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मांडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दूध भेसळ प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला असून, सुरेश धस यांच्या इशाऱ्यानंतर जयंत पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.