Mumbai News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शनिवारी (ता.31) सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता यानंतर सुनेत्रा पवारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. तसेच अजितदादांच्या अकाली जाण्यानं मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार असल्याचं सांगितलं आहे.
तसेच अजितदादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन अशी ग्वाहीही सुनेत्रा पवारांनी आपल्या पोस्टमधून दिली आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत असल्याचंही त्या पोस्टमध्ये म्हणतात.
अजितदादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 'विकसित भारत 2047' या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते.
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर लगेचच तासाभरात सुनेत्रा पवार यांचे खातेवाटपही जाहीर झाले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्यांना सरकारी निवासस्थान असलेला बंगलाही देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी केवळ तासाभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावल्या आहेत.
सुनेत्रा अजित पवार यांनी 31 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. पण त्याला अजित पवारांच्या निधनाची दुःखद अशी किनार आहे.
त्यानंतर तासाभरातच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडं देण्यात येणारे खाते वाटपही जाहीर करण्यात आले. यापूर्वी अजित पवारांकडं जी खाती होती त्यापैकी केवळ अर्थमंत्रीपद न देता राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक आणि वक्फ ही तीन खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.