Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंत्री, आमदार, खासदार तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी यापुढील काळात पक्ष अजित पवारांच्या विचारांवर चालणार असल्याची ग्वाही देतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय वाटचालीवरही भाष्य केलं.यावेळी त्यांनी कडक शब्दांत इशाराहा दिला आहे.
राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलेल्या भाषणात आपण पक्षहितालाच सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरु असलेल्या कुरघोडी, तसेच नेत्यांमधील सुप्त संघर्षावर बोलताना सज्जड दम भरला.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाचा अनावश्यक हस्तपेक्ष झाल्यास मला कटू निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी पक्षाची बदनामी खपवून घेणार नसल्याचा कडक इशाराही दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
प्रत्येकवेळी मी सर्वांना समजून घेतलं. सावरून घेतलं. दादांनीही त्यांच्या हयातीत सर्वांना खूप समजून घेतलं. सर्वांचे हट्ट पुरवले. प्रेम केलं. मान-सन्मान दिला. पदं दिली. जे जे म्हणाल, ते त्यांनी त्यांच्या परीने दिलं. यापुढे मीही पक्षहितालाच सर्वोच्च प्राधान्य देणार आहे, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कटू निर्णय घेत होते. त्याचप्रमाणे असे निर्णय घेण्यास मला जड जाईल, पण पक्षहितासाठी मी तेही कटू निर्णय घेईन, असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्येष्ठांचा सन्मान कायम राखत नव्या पिढीला संधी देणार असल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा यांचा समन्वय साधत पक्षाची वाटचाल पुढे नेणार आहे,असंही पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार यांनी यावेळी महामंडळे आणि विविध संस्थांमधील नियुक्त्यांबाबतही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, पक्षनिष्ठा, समर्पण, गुणवत्ता आणि पात्रता यांचा विचार करूनच संधी दिली जाईल. केवळ किती वर्षे काम केले, यापेक्षा पक्षाला पुढे नेण्यासाठी दिलेल्या योगदानाला अधिक महत्त्व देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सुनेत्रा पवार भाषणादरम्यान भावुक झाल्या.आपल्या सर्वांचे नेते दादा आज आपल्यात नाही. आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पहिलाच वर्धापन दिवस आहे. आजचा वर्धापन दिनाची थीम ही समर्पण संघर्ष संकल्प अशी होती. कारण दादांनी राज्याच्या विकासाला दिलेले समर्पण आपण पाहिलेले आहे. दादांच्या कामाची पद्धत सगळ्यांनी पाहिली. दादांनी जे कठोर परिश्रम घेतले ते सगळ्यांनी पाहिले आहेत, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या.
तसेच अजितदादांचे विचार मूल्य आणि कामाची पद्धत नेहमी मार्गदर्शक ठरणार असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आदरणीय दादांच्या पश्चात सगळा राष्ट्रवादी काँग्रेस परिवार माझ्या पाठीशी राहिला. दादांना फक्त अडीच वर्षांचा कालावधी मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्यांना काम करता आले, त्यांनी सातत्याने काम केल्याचंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.