Mumbai, 26 February : मला तो 25 सप्टेंबर 2012 हा दिवस आठवतो. सकाळी सातलाच अजितदादांनी मला बोलावून ‘सुनीलजी, आज मी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. मी माझ्या आईशी किंवा पत्नीशी बोललो नाही, फक्त तुमच्याशी बोलतो आहे,’ असे सांगितले. त्यावेळी मी दादांना ‘मी तुमच्यापेक्षा वयाने चार वर्षांनी मोठा असलो तरी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आपण हा राजीनाम्याचा निर्णय साहेबांच्या (शरद पवार) कानावर घालावा,’ असे सुचवलं होतं, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईच्या वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या बोलताना तटकरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, अजितदादांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पाडण्याची दुर्दैवी वेळ नियतीने आपल्या सर्वांवर आणली आहे. एकेविसाव्या शतकातील वलंयाकित नेतृत्व म्हणून अजित पवार (Ajit pawar) यांच्याकडे देशाने आणि राज्याने पाहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीत अजितदादांचे योगदान फार मोठ्या प्रमाणात राहिलं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत सर्वसामान्यांच्या भावानांचा विचार करत त्यांनी राज्यात राष्ट्रवादी पक्ष विस्तारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत आपण ५६-५७ वरच मर्यादित राहिलो होतो. पण एका गोष्टीचा अभिमान आहे, छगन भुजबळ हेही या गोष्टीचे साक्षीदार आहात. आपण सर्वजण त्यात परिश्रमपूर्वक होतो, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत आपण क्रमांक एकचा पक्ष म्हणजे ७३ च्यावर जागा आपण जिंकल्या होत्या. त्या यशात सर्वाधिक योगदान हे अजितदादांचं हेातं. त्याचा उल्लेख मी करू शकतो. राजकाणात अनेक गोष्टी घडत असतात. माझ्या मेघदूत बंगल्यावर २००९ मध्ये विधीमंडळ पक्षाची बैठक होण्यापूर्वी आमदारांची एक बैठक झाली. त्यावेळी दादांना उपमुख्यमंत्री करावं, अशा भावना काही आमदारांनी मांडल्या होत्या. पण त्या वेळी ते होऊ शकलं नसेल कदाचित. २००४ मध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून निर्णय घेतला असता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे सर्वात्तम मुख्यमंत्री दादांच्या रुपाने महाराष्ट्राने अनुभवला असता.
पुढे अनेक घडामोडी होत गेल्या, एखादं नेतृत्व जेव्हा ताकदवान, शक्तीमान होतं. त्यांचा धाक, दरारा, त्याची पकड संपूर्ण राज्यभर निर्माण होते. तेव्हा टीका टिपण्णीला धार येत गेली. त्याचा मोठा मनस्ताप अजितदादांना झाला. दादांचा एक सहकारी म्हणून ऋण व्यक्त करतोय की, २०१२ पासून आजपर्यंत त्यांच्यावर एवढे आरोप हेात असताना सावलीसारखी साथ आपण दिली, त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान केवळ आपलाच होता, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मला तो २५ सप्टेंबर २०१२ हा दिवस आठवतो. सकाळी सात वाजता दादांनी मला बोलावलं. त्या दिवशी मी आणि आर. आर. पाटील रायगड पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी जाणार होतो. मला साडेसात वाजता सांगितलं, सुनीलजी, आज मी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. मी माझ्या आईशी किंवा पत्नीशी बोललो नाही, फक्त तुमच्याशी बोलतो आहे. त्यावेळी मी दादांना सांगितलं, मी तुमच्यापेक्षा वयाने चार वर्षांनी मोठा असलो तरी तुमच्या पायाला हात लावून सांगतो आपण हा जो राजीनाम्याचा निर्णय घेत आहात, तो आपण साहेबांच्या (शरद पवार) कानावर घालावा.
मी अलिबागला जाऊन कार्यक्रम करून परत आलो, त्यावेळी अजितदादांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, प्रमुख नेते हे देवगिरीवर येऊन दादांनी राजीनामा का दिला, याबाबत सर्वांच्या मनात हळहळ निर्माण झालेली होती, असेही तटकरेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.