Supriya Sule and Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Supriya Sule News :''आपण एका ताटात जेवलोय...'' अजितदादांना उद्देशून सुप्रियाताईंचं सूचक विधान!

Mayur Ratnaparkhe

Supriya Sule and Ajit Pawar Group : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण कमालीचं तापलेलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यभरात आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ, दगडफेक आणि याचबरोबरीने लोकप्रतिनिधीचं राजीनामा सत्रही सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना, ' मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सरकारचीच नव्हे तर सर्वांचीच भूमिका आहे. आजच्या बैठकीत, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, असा ठराव करण्यात आला. त्याचवेळी इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीही भूमिका घेण्यात आल्याचे सांगितले.

या बैठकीनंतर आता विविध राजकीय नेते मंडळींच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका करत, अजित पवार गटाला एक सूचक इशारा दिला आहे. याशिवाय त्यांनी राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''ज्या पद्धतीने मराठा, धनगर, लिंगायत मुस्लिम समाज यांच्या आरक्षणाचे विषय असतील. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण याबरोबरच गृहमंत्रालयाचं जास्त आहे. त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे.''

याचबरोबर ''कालच एका वकिलांचं पूर्णपणे स्पष्टीकरण आलं आहे. ते काय म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर आम्ही त्यांना विधान परिषदेवर पाठवू. म्हणजेच यांना माहीत आहे की ते अपात्र ठरणार आहेत. म्हणजे त्यांनाही दगाफटका झालाच ना? मग शिंदेंनाही दगाफटका केला. यांना जर माहीत होतं, की अपात्र ठरले जाणार आहेत, तर अगोदर उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, त्यानंतर आता शिंदेंना ते अपात्र करणार, असं हे देवेंद्र फडणवीसच म्हणत आहेत. शिवसेनेला (उद्धव ठाकरेंना) केला तर केला परंतु स्वत:च्या घटक पक्षांनाही हे दगाफटका करत आहेत,'' असंही सुळे यांनी म्हटलं.

याशिवाय ''माझी अजित पवार गटाला विनम्र विनंती आहे, की कधीतरी एका ताटात जेवलो आहोत आपण. ते आता शिंदेंनाही धोका देत आहेत. त्यामळे सांभाळून राहा, या भाजपा अन् भ्रष्ट जुमला पार्टीपासून,'' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला सूचक इशाराही या वेळी दिला.

(Edited By - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT