Uddhav Thackeray, Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare News : गेल्या तीन दिवसांत ४० कोटींच्या फाईल्स कोणाकोणाच्या निघाल्या? : कायंदेंच्या प्रवेशावर शिवसेना नेत्याचे सूचक विधान

सरकारनामा ब्यूरो

Shiv Sena News : मागच्या तीन दिवसांत मंत्रालयातून चाळीस आणि त्यापेक्षा जास्त कोटींच्या फाईल कुणाच्या कुणाच्या निघालेल्या आहेत. त्यात किती आमदारांची नावे आहेत. त्यात ठाकरे गटाला सोडून गेलेले तुम्ही चर्चा करत असलेली नावे आहेत का, हेही एकदा चेक करा. त्यातून हे प्रवेश का होताहेत याचे उत्तर मिळेल, असे सूचक विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.

ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अंधारे बोलत होत्या. यावेळी अंधारे म्हणाल्या, मनीषा कायंदे यांच्या प्रवेशांच्या चर्चाणवर मला धक्का वगैरे काही बसलेला नाही. कारण २३ जून रोजी त्यांची विधान परिषदेची टर्म संपत आहे. त्यांनी ती कायम पाहिजे असेल त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असावा. प्रत्येकला प्रगती करण्याचा अधिकार आहे. काही लोकांना प्रगती माणुसकी, प्रतिष्ठा आणि निष्ठा टिकवण्यात असते, असे वाटते. काहींना पद वाढविण्यात असते, असा टोला त्यांनी लगावला.

तसेच अंधारे (Sushma Andhare) यांनी आज (ता.18) अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणांची कागदपत्रे माझ्याकडे एका भाजप नेत्याकडून आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मराठवाड्यातील शिंदे गटातील एक मातब्बर मंत्र्याचा नंबर लागणार असून त्याचीही कागदपत्रे बाहेर येणार आहेत. सातारा जिल्ह्यातील एका आमदाराचेही प्रकरणही रडारवर आहे, असल्याचे सांगून बदलीसाठी दीड कोटीचा व्यवहार कोण करतेय, असा गौप्यस्फोटही अंधारे यांनी केला.

अंधारे म्हणाल्या की, कृषिमंत्री सत्तार यांच्याबाबतची कागदपत्रे माझ्याकडे एका भाजपच्या नेत्याकडून आली होती. मात्र मी त्यावेळी सांगितले होते की, आम्ही आमची शिकार स्वतः करतो. लोकांनी आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप मारणार नाही. भाजप (BJP) आम्हाला मॅनिप्लेट करत असेल, तर आम्ही मॅनिप्लेट होणारे नाही. भाजप आणि शिंदे गटाने काय असेल ते आपापसांत मिटवावे.

मराठवाड्यातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचा लवकरच नंबर लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचीही कागदपत्रे बाहेर येणार आहेत. ती माझ्याकडे तर आली आहेत. तसेच, कोणाच्या ना कोणाच्या मार्फत पावसाळी अधिवेशनात चर्चेला येणार आहे. मराठवाड्यातील शिंदे गटातील हा मातब्बर मंत्री आहे, तो रडारवर आहे. त्याची कागदपत्रे लवकरच येणार आहेत, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या की, या सरकारमध्ये सर्व घोटाळेच घोटाळे आहेत. आणखी एक प्रकरण रांगेत आहे, ते सातारा जिल्ह्यातील एका आमदाराचे आहे. सातारा जिल्ह्यात किती आमदार आहे, ते तुम्ही शोधा. काय काय चालले आहे, 'डीसीएम'कडे कोण जाते. तिकडे किती बदल्यांचे गैरव्यवहार चालले आहेत. बदलीसाठी दीड कोटींचा बदलीचा व्यवहार कोण करत आहे. ती बदली कोणाची होणार, जिल्हा परिषदेतून एक इंजिनिअर थेट कार्यकारी अभियंता म्हणून पुण्याला नेमायचा आहे. या सर्वाची चौकशी डीसीएम यांनी करावी, असेही अंधारे म्हणाल्या.

गुळाचा गणपती कोण

दुसऱ्या मंत्र्याची कागदपत्रही भाजपच्या लोकांकडून आलेली आहेत. मी त्याला नकार दिला तर ते म्हणतात की घ्या ताई. पावसाळी अधिवेशनात कुणाच्या तरी मार्फत आम्ही ती काढूच. शिवसेनेने (Shivsena) दिलेली ती जाहिरात भाजपच्या जिव्हारी लागले आहे. या सरकारचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता २६ टक्के, देवेंद्र फडणवीसांची २३ टक्के दाखवली गेल्यामुळे फडणवीसांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि इतर नेते सक्रीय झाले आहे. त्यांना वाटते की आता गुळाच्या गणपतीचे विसर्जन झाले पाहिजे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT