TET Latest News : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET घोटाळा प्रकरणातील उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2018 आणि 2019 मध्ये झालेल्या TET परीक्षांमध्ये उत्तरपत्रिका बदलून गुण वाढवल्याच्या आरोपांनंतर काही उमेदवारांचे निकाल रद्द करण्यात आले होते.
ही कारवाई न्यायालयाने योग्य ठरवली असली, तरी संबंधित उमेदवारांवर भविष्यातील TET परीक्षांसाठी घालण्यात आलेली कायमस्वरूपी बंदी मात्र रद्द केली आहे. त्यामुळे या उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा देण्याचा मार्ग खुला झाला आहे.
न्यायमूर्ती किशोर संत आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने गैरप्रकाराच्या आरोपांनंतर रद्द केलेले जुने निकाल कायम राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, एखाद्या उमेदवाराला भविष्यातील परीक्षांपासून कायमचे दूर ठेवण्यापूर्वी त्याला स्वतःची बाजू मांडण्याची पुरेशी संधी देणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा विचार करत न्यायालयाने कायमस्वरूपी बंदीचा निर्णय बाजूला केला. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आगामी काळात TET परीक्षा देता येईल. मात्र, बंदी हटवण्यात आल्याचा अर्थ संबंधित उमेदवार आरोपांतून निर्दोष ठरले, असा होत नाही, हेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
सरकार आणि परीक्षा परिषदेला या प्रकरणातील चौकशी पुढे सुरू ठेवण्याची मुभा आहे. चौकशीमध्ये एखादा उमेदवार दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात नियमानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पुनर्परीक्षेची संधी मिळाली असली तरी आरोपांच्या चौकशीपासून उमेदवारांना पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही.
या निकालाचा लाभ मात्र सर्वच याचिकाकर्त्यांना मिळणार नाही. न्यायालयासमोर वस्तुस्थिती लपवणाऱ्या तसेच पोलिसांच्या जबानीत नाव असूनही याचिकेत त्याचा उल्लेख न करणाऱ्या उमेदवारांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरोधात ३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेली कारवाई कायम ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणात TET अनिवार्य झाल्यानंतर सेवेत असलेल्या अनुभवी शिक्षकांचाही मुद्दा उपस्थित झाला होता. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अंजुमन इशआत-ए-तालीम ट्रस्ट प्रकरणातील २९ मे २०२६ रोजीच्या निर्णयाचाही आधार घेतला. त्यामुळे गैरप्रकारावरील कारवाई कायम ठेवतानाच भविष्यात परीक्षा देण्याची संधी देण्याचा मार्ग न्यायालयाने स्पष्ट केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.