Nitin Deshmukh
Nitin Deshmukh  Sarkarnama
मुंबई

Nitin Deshmukh : नितीन देशमुखांचे उपोषण मागे; पण कारवाईची टांगती तलवार कायम

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण केलं. त्यानंतर विधीमंडळाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.

अकोला-बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाण्यासाठी आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने ते मागे घेतलं. त्यामुळे माझ्या मतदारसंघावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप करत ते पुन्हा सुरू करण्यासाठी देशमुखांनी आज उपोषण केलं.

विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी देशमुखांच्या या आंदोलनावर नाराजी व्यक्त करत विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन न करण्याचं सांगितलं. पण तरीही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा नार्वेकरांनी दिला.

अकोला-बाळापूर मतदारसंघातील पाणी योजनेला स्थगिती दिल्यामुळे आमदार देशमुखांनी हे उपोषण केलं. पण हा मुद्दा मंत्री शंभुराज देसाईंनी विधानसभेत मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची आपली परंपरा नाही. आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलं जातं. त्यामुळे हे योग्य नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शंभुराज देसाई यांनी केली.

दरम्यान, ''देखमुखांना चर्चेसाठी माझ्या दालनात बोलावलं होतं. पण ते आले नाहीत. त्यामुळे मी त्यांना शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करू नका अशी समज दिली.

त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल'', असा इशारा नार्वेकरांनी दिला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मात्र, शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखमुखांना त्यांच्या मतदारसंघातील 69 गावातील पाण्यासाठीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT