Mumbai, 21 March : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी आज विधानसभेत मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केला. गेली पाच वर्षांपासून हा प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी आज उद्विग्नपणे आपल्या भावना मांडल्या. परभणीतील समांतर जलवाहिनीच्या कामाला आणि भूमिगत ड्रेनेज लाईनला प्रशासकीय मान्यता देणार का आणि देणार नसाल तर आम्ही तर राजीनामा देऊन निघून जातो, अशी धमकी दिली.
आमदार राहुल पाटील (Rahul Patil) म्हणाले, गेली पाच वर्षांपासून मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे. आपण एक कर्तबगार आमदार राहिलेले आहात. खाली काम करताना किती अडचणी निर्माण होतात, हे आपल्याला माहिती आहे. ता. १७ सप्टेंबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे येऊन परभणीची अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन किंवा समांतर पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीची घोषणा केली. परभणीच्या या योजनांना उच्चस्तरीय समितीनेही मंजुरीही दिलेली आहे. सांस्कृतिक नगर म्हणून परभणी प्रसिद्ध आहे. पण, नाट्यगृहाचे कामही अर्धवट राहिलेले आहे.
परभणीसाठी (Parbhani) २०२३ मध्ये समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. मंजुरीवेळी या योजनेचा खर्च फक्त ४०८ कोटी रुपये होता. पण, आज या योजनेचा खर्च ८०० कोटींवर गेलेला आहे. अंडरग्राउंड ड्रेनेजचा २०१९ मध्ये प्रोजेक्ट खर्च १०८ कोटी होता, तो आज जवळपास २०० कोटींपर्यंत गेला आहे, असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.
आमदार राहुल पाटील म्हणाले, परभणीत काय जनता राहत नाही का. परभणीच्या जनतेसोबत तुम्ही असा दुजाभाव का करता, असा माझा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी जेवढी आयुधं माझ्याकडे उपलब्ध आहेत, जितके फोरम असतील, त्या फोरमवर या गोष्टी प्रमाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यक्ष महाराज मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो की, परभणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सातत्याने या प्रश्नावर आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, विधानसभेतही प्रश्न उपस्थित करतोय.
आपण अंडरग्राउंड ड्रेनेज योजनेला मंजुरी देणार का आणि पाच लाख लोकसंख्या असलेल्या परभणीला समांतर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून बंद नलिकेद्वारे पाणी दिलं तर एक थेंबसुद्धा पाणी वाया जाणार नाही. शिवाय हे पाणी उतारावरून वाहत येत असल्याने विजेचीही बचत होणार आहे. मंत्री महोदय, तुम्ही योजनेला प्रशासकीय मान्यता देणार का. देणार नसाल तर आम्ही तर राजीनामा देऊन निघून जातो, असा इशारा राहुल पाटील यांनी दिला.
उदय सामंतांचे बैठक घेण्याचे आश्वासन
राहुल पाटील यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे उदय सामंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, या योजना अमृत २.० मधून मंजूर झालेल्या आहेत. या संदभातील कर्ज मंंजुरीसाठी आपण तपासणी करून घेऊ. त्याबाबतचा योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. तसेच नाट्यगृहासाठी सरकारने १० कोटी दिले होते. त्यात इतर कामांचा समावेश करण्यात आल्याने इस्टिमेंट २३.९१ कोटी रुपये झाला आहे, त्याबाबतही योग्य तो निर्णय घेतला जाईल. यावर बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.