Thane Politics : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाने ठाणे जिल्ह्यात पक्षवाढीचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नात एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या कळव्यात 'सर्जिकल स्ट्राइक' करत ऑपरेशन 'धनुष्यबाण' यशस्वी केले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.
आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, मनिषा साळवी, प्रमिला केणी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, सचिन म्हात्रे, युवानेते मंदार केणी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळल्याने आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. तर एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आले होते. या सर्वाधिक नगरसेवक मुंब्रा-कळवा या भागातून निवडून आले होते. तर भाजपला जेमतेम 23 जागांवर समाधान मानावे लागले होते. पण आता राज्यात या पक्षांचे गट झाले असून, सर्व राजकीय गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादी विभागल्यानंतर 34 पैकी हणमंत जगदाळे आणि राजन किणे यांच्यासोबत 7 जण गेले. त्यानंतर नजीब मुल्ला यांनाही 8 नगरसेवकांना गळाला लावत राष्ट्रवादीत आणले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे अवघे 18 नगरसेवक शिल्लक राहिले होते. आता त्यापैकी आणखी 7 जण शिवसेनेत गेल्याने ही संख्या 10 वर घसरली आहे.
कळवा भागात राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक होते. यामध्ये एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता, तर एक माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नऊ माजी नगरसेवक राहिले होते. अशात या नव्या सात जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांची वजाबाकी पाहिल्यास आता केवळ दोनच शिलेदार उरले आहेत. त्यांनाही गोटात घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
यातही विश्वासू शिलेदारांनीच साथ सोडल्याने आव्हाड यांना दुसरा धक्का बसला आहे. मिलिंद पाटील हे आव्हाड यांचे उजवे हात ओळखले जात होते. आव्हाड राज्यभर फिरत असताना कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण नियोजनाची जबाबदारी तेच सांभाळत होते. कळवा पूर्वचे नगरसेवक महेश साळवी यांची आव्हाडांचे विश्वासू नगरसेवक म्हणून ओळख होती.
तर दरवर्षी प्रमिला केणी व दिवंगत मुकुंद केणी हे हजारोंच्या फरकाने कळव्यातून निवडून येत होते. याच सर्व विश्वासू शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आव्हाडांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस समाजकारणात, राजकारणात येतो, त्यावेळी त्याची अपेक्षा असते की, आपल्या प्रभागाचा विकास व्हावा, यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे मिलिंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भविष्याचा विचार करणे गरजेचे होते, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.