Nana Patole in Rally
Nana Patole in Rally sarkarnama
मुंबई

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्या विरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने सक्रीय भाग घेतला. अकोल्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी रिक्षा चालवली. या रॅलीत अकोला शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजीद पठाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.  

प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, तीन कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करत असून एका वर्षापासून हे आंदोलन सुरुच आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. कृषी कायदे, कामगार कायद्यात बदल करुन शेतकरी, कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकराच्या काळात फक्त दोन चार उद्योगपती मित्रांचा फायदा होत असून १३० कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही. धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, हातकणंगले येथे आ. राजू आवळे, बुलढाणा येथे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला तर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नाशिक, लातूर, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी भारत बंदमध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेत मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT