Omicron Sarkarnama
मुंबई

चिंता वाढली; राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव

यामुळे देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) नवीन ओमिक्रॉन व्हेरीयंटने देशाची चिंता वाढवली आहे. त्यातच आता ओमिक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण महाराष्ट्रात डोबिवलीमध्ये आढळला आहे. हा तरुन दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेला आहे. त्या शिवाय ओमिक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटक, एक गुजरात आणि आता एक महाराष्ट्रात सापडला आहे. यामुळे देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहेत. या तरुणाला सौम्य ताप आला होता. त्याला इतर कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, ताप आल्यामुळे त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले असता त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. त्याला सौम्य स्वरूपाचा ताप असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या जवळच्या लोकांना आणि २३ कमी जोखमीच्या निकट च्या लोकांचा शोध घेण्यात आला. त्यातील सर्वजण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली. यापैकी सर्वजण निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहीत पालिकेच्या वतीने दिली आहे. या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला आहे. या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही.

आज (ता. ४) सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातून आलेल्या सर्व ३ हजार ८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. इतर देशांमधून आलेल्या १७ हजार १०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील सर्वेक्षण सुरु आहे. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत. त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT