Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला. मात्र, अजित पवार यांच्या एन्ट्रीने शिंदे गटातील काही आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढल्याने शिवसेनेतील (शिंदे गट) मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं असल्याने त्यांचा सर्व विभागांमध्ये हस्तक्षेप वाढला असल्याचे बोलले जात आहे. या हस्तक्षेपाला फक्त शिंदे गटातील मंत्रीच नाही, तर भाजपाच्याही काही मंत्र्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
यातच काही दिवसांपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेतल्या होत्या. पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. पण तरीदेखील अजित पवार हे सुपर पालकमंत्री असल्यासारखे बैठका घेत होते. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही नाराज झाल्याची चर्चा होती.
यानंतर भाजपाच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रारही केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यानंतर निधी वाटपावरूनही शिंदे गटासह भाजपच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
आता अजित पवारांचा सर्व विभागांमध्ये हस्तक्षेप वाढल्याने मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला अजित पवार गेले नव्हते. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सर्व आलबेल आहे ना ? याबद्दल आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत आले होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण अजित पवार मात्र अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान गैरहजर होते.
त्यांच्या या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. आता अजित पवारांच्या सर्व विभागांमधील हस्तक्षेपावर आणि अस्वस्थता पसरलेल्या मंत्र्यांची वरिष्ठ कशी समजूत काढतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.