मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पूत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आता तेच गुन्हे त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यादृष्टीने ठाकरे सरकारने पावले टाकण्यात सुरूवात केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) माहिती देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनीच याबाबत स्पष्टपणे सांगितले की, आमदार नितेश राणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी मालवणी विभागाच्या एसीपींनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. त्यांना त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे राणे आज एसीपी कार्यालयात येण्याची शक्यता आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईंअंतर्गत पोलिस राणेंकडून बाँड लिहून घेतील. त्यात राणेंना एकपेक्षा जास्त जामीनदार लागतील. या बाँडचं उल्लघंन झाल्यास राणेंवर अटकेची कारवाई होऊ शकते, असंही सांगितलं जात आहे. राणेंची कोंडी करण्यासाठी ठाकरे सरकारकडून ही पावले टाकली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मागच्या चार महिन्यांमध्ये संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ला प्रकरण, अधीश आणि नीलरत्न बंगल्यावरील कारवाई, दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणातील चौकशी अशा लागोपाठच्या घटनांमध्ये राणे कुटुंबीय अडचणीत आले होते. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बेधुट आरोप आणि अत्यंत खालच्या दर्जाची टीका केल्याच्या आरोपांवरुन नारायण राणे, नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिशा सॅलियन प्रकरणात गुन्हा
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना नुकताच अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दिशाच्या आई-वडिलांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.
संतोष परब प्रकरणात जामीन
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक झाली होती. या प्रकरणात ते जामीनावर सुटले आहेत. राज्यभरात हे प्रकरण चांगले गाजले होते. ऐन निवडणुकीच्या काळात नितेश राणे अज्ञातवासात गेल्याची चर्चाही होती. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने ते पोलिसांसमोर हजर झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.