Raju Patil, Eknath Shinde Latest News
Raju Patil, Eknath Shinde Latest News sarkarnama
मुंबई

मनसे आमदारानं मुख्यमंत्री शिंदेंना करुन दिली आठवण; म्हणाले, आता तरी मुहूर्ताची..

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांच्या कामाची 48 कोटीची वर्क ऑर्डर निघून तीन महिने उलटले अद्याप कामास सुरुवात न झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील महिन्यातच शिवसेनेच्या मेळाव्या आधी आमदारांनी ट्विटरद्वारेच सत्ताधाऱ्यांना या कामाची आठवण करुन दिली होती, मात्र ही कामे अद्याप कुणी मनावर घेतली नसल्याचे दिसते. त्यातच आता मनसे व शिंदे गटाची जवळीक सध्या वाढली आहे.

माझी चार कामे होणार असतील तर खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यालयात मी जाण्यास तयार आहे, असे वक्तव्य आमदार पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केले आहे. त्यानंतर शुक्रवारी आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जुन्या ट्विटची आठवण करीत ''आता तरी मुहूर्त न बघता रस्त्यांची कामे करा'' अशी मागणी केली आहे. मनसे-शिंदे गटातील जवळीकीमुळे हे काम मार्गी लागते का ? आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (Raju Patil, Eknath Shinde Latest News)

एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला असून त्यामधील 48 कोटीच्या कामाची निवीदा एमएमआरडीएने जाहीर केली होती. निवासी भागातील रस्ते काम कोणी करायचे यावरुन एमआयडीसी व केडीएमसी यांच्याकडे पुरेसा निधी नसल्याने एकमत होत नव्हते. यावर 50 - 50 टक्के भागीदारीत काम करण्याचे ठरले आणि एमएमआरडीएने 48 कोटी कामांच्या निविदा देखील मंजुर केल्या.

या सर्व कामाचे श्रेय शिवसेनेने घेत निधी मंजुर झाल्यानंतर त्याचे मोठ बॅनर लावित जाहीरातबाजी करण्यात आली होती. बॅनरबाजी झाली, श्रेय लाटून झाले. मात्र कामास सुरुवा होत नसल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार पाटील यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे.

सप्टेंबर महिन्यात डोंबिवलीत शिवसेनेचा मेळावा होता. या मेळाव्याच्या आदल्या दिवशी रातोरात शहरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर रस्त्यांची कुंडली मांडण्यात आली होती. रस्ते कामाचा मुहूर्त शोधण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे, असे संदेश लिहून मनसेने शिवसेनेला डिवचले होते. एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची 15 जुलै 2022 ला वर्क ऑर्डर निघाली आहे. ती ऑर्डर माझ्या हातात आहे, अजून का नाही त्याचे काम सुरु झाले. निवडणूकीच्या तोंडावर ही कामे सुरु करणार आहात का?,असा सवाल त्यावेळी आमदार पाटील यांनी शिवसेनेला विचारला होता. हे ट्विट शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.

आमदारांचे ट्विट पडताच शिंदे गटाचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी देखील ट्विट करत ज्योतिष शोधण्यासाठी बॅनर लावायची गरज नाही, ज्योतिष तुमच्या शेजारी आहेत,असे ट्विट करत अप्रत्यक्षपणे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. तर लेकी बोले सुने लागे अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी कोपरखळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना लगावली होती. एकंदरीत निवासी भागातील रस्त्यांवरुन शिंदे गट आणि मनसेत ट्विटरवॉर रंगल्याचे पहायला मिळाले होते.

दरम्यान, आता पावसाने उघडीप दिली असून हिवाळ्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामास सुरुवात होणे अपेक्षित असल्याने आमदारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कामाची आठवण करुन दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे, एमएमआरडीए यांना जुने ट्विट पुन्हा एकदा टॅग करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातील ट्विटमधील ती रस्त्याची कुंडली व कामाची वर्क ऑर्डर पुन्हा एकदा दाखविण्यात आली आहे. ''पावसाळा गेला, हिवाळा सुरु झाला. आता तरी मुहूर्ताची वाट न बघता डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील रस्त्यांची कामं सुरु करा.'' असे ट्विट पाटलांनी आज केले आहे. आता यावर काय शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT