Bawankule Warning Thackeray :  Sarkarnama
मुंबई

Bawankule Warning To Thackeray : कार्यकर्त्यांचा संयम संपत चाललाय...; बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा

अनुराधा धावडे

Mumbai Political News : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत खुला इशारा दिला आहे. 'कार्यकर्त्यांचा संयम संपत चालला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,' अशा शब्दांत बावनकुळेंनी ठाकरेंना इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा भाजप आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"शांततेत चाललेल्या आंदोलनात पोलिस हल्ला करतीलच कसा, पण जालन्यात पोलिस आले काय आणि लाठीहल्ला झाला काय, हे म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे जालना हत्याकांड झाले. पण ही परिस्थितीला जबाबदार कोण. हा माणूस मला माहिती नाही, पण सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी समोर बसलेल्या उपस्थितांनाच सवाल केला. तसेच, टरबुजासारखा होता का तो. मी टरबुजासारखा माणूस पाहिलेला नाही. कोण आहे असा टरबुजासारखा माणूस. तुम्हाला माहिती असेल तर नंतर मला सांगा, असे म्हणत ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीकाच केली होती.

बावनकुळे काय म्हणाले?

ठाकरेंच्या टीकेला उत्तर देतान बावनकुळे म्हणाले, " राजकारणाच्या काही मर्यादा असतात, राजकारण करताना आपण काही बाबी पाळत असतो. मला वाटतंय पक्षाचे कार्यकर्ते केव्हा संयम सोडतील ते मलाही सांगता येणार नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची मर्यादा संपली आहे. वाईट शब्दांत ते आमच्या नेतृत्वावर बोलत असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करत आहेत. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते संयम सोडतील," अशी परिस्थिती आहे.

"मी मागेच सांगितलं होतं, आमची कोणाचीच इच्छा नाही की, राज्यातील वातावरण कलुषित व्हावं, राज्यात शांतता राहावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी हे उद्धव ठाकरेंनीच ठरवलं आहे. त्यामुळे त्यांनी जर ठरवलंच असेल तर जे होईल ते होईल. त्यामुळे आमचे कार्यकर्तेच उद्धव ठाकरेंना उत्तर देतील." असा अप्रत्यक्ष इशाराच उद्धव ठाकरेंना दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT