Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंनी तुपेंना कोंडीत पकडले; ‘ही संधी पुन्हा नाही...सचिवांना बांधून आणण्याची परवानगी द्या अन्‌ तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहून घ्या’

Maharashtra Assembly Session 2025 : मागील अधिवेशनातही सुधीरभाऊंनी आपल्याच सरकारला अनकेदा धारेवर धरले होते, त्यातून सरकारला नामुष्कीला समोरे जावे लागेल होते. आता पावसाळी अधिवेशनातही सरकारला कोंडीत पकडताना विधानसभेचे तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांना चिमटे काढले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 01 July : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या कामाची दिशा पुन्हा एकदा दाखवून दिली. मागील अधिवेशनातही सुधीरभाऊंनी आपल्याच सरकारला अनकेदा धारेवर धरले होते, त्यातून सरकारला नामुष्कीला समोरे जावे लागेल होते. आता पावसाळी अधिवेशनातही सरकारला कोंडीत पकडताना विधानसभेचे तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांना चिमटे काढले. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जसे सचिवांना बांधून आणले जाते, तशी परवानी द्या आणि तुमचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहून घ्या. पुन्हा अध्यक्ष होण्याची संधी मिळेल की नाही, मला माहिती नाही, असेही सुधीरभाऊ म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत २९३ ची राज्याच्या विकासकामांसंदर्भात चर्चा सुरू होती. या चर्चेवेळी संबंधित विभागाचे सचिव सभागृहात उपस्थित नव्हते, तो मुद्दा धरून सुधीरभाऊ मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपल्याच सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, माझा पॉईंट ऑफ इर्न्फमेशन असून तो महत्वाचा आहे. मी अनेक वर्षांपासून या सभागृहाचा (विधानसभा) सदस्य आहे. राज्याच्या प्रगतीसाठी २९३ ची चर्चा आवश्यक असते. या सभागृहाचे सदस्य योगेश सागर हे मनापासून भाषण देत होते आणि मी ऐकत होतो. माझा पॉईंट ऑफ इर्न्फमेशन हा आहे की, एकीकडे आपण सुखी, समृद्ध, संपन्न, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र घडविण्यासाठी २९३ मांडली.

अध्यक्ष महोदय संबंधित विभागाचे मंत्री व्यस्त असू शकतात. त्या विभागाचे मंत्री कामाच्या व्यस्तेत असणार, हे मी समजू शकतो. पण विधानसभेत चर्चा सुरू असताना त्या विभागाचा एकही सचिव त्या ठिकाणी बसत नाही. अध्यक्ष महोदय, मी १९९५ पासून आमदार हे विभागाचे सचिव अशा महत्वाच्या चर्चेवेळी ते सभागृहात बसायचे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुनगंटीवार म्हणाले, तुम्हाला माझी विनंती आहे. तुम्हाला तालिका अध्यक्ष म्हणून एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. ती पुन्हा प्राप्त होईल की नाही, याबाबत मला माहिती नाही. पण, एक तालिका अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या विधीमंडळाची जेव्हा शताब्दी होईल, तेव्हा तुमचं नावसुद्धा त्या ठिकाणी आदराने घेता यावं, यासाठी विधानसभेत २९३ चर्चा सुरू असताना सचिवांनी सभागृहात बसलं पाहिजे, एवढे तरी निर्देश द्यावेत.

संबंधित विभागाचे सचिव जर सभागृहात बसत नसतील, तर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये जसं बांधून घेऊन यायचे, तशी आपल्याला काही परवानी देता येईल का, हे पाहावे आणि तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहून घ्या. तुम्हाला पुन्हा ही संधी येणार नाही. एवढी माझी आपल्याला विनंती आहे, असे सांगून चेतन तुपेंचीही मुनगंटीवर यांनी कोंडी केली.

सरकारने कारवाई करावी : चेतन तुपे

सुधीरभाऊंनी टाकलेल्या डावात न अडकता तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी सरकारला निर्देश दिले. सचिवांची गॅलरी जरी अदृश्य असली तरी विषयाचे आणि सभागृहाच्या सदस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने या संदर्भात कारवाई करावी. टीव्हीवर हे सगळे बघितलं जाते, गरज पडल्यास टीव्ही बंद करावेत, त्यामुळे सगळ्यांना सभागृहा येण्याची सवय लागेल, त्यामुळे सरकारने योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश तुपे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT