NCP Mahesh Tapase
NCP Mahesh Tapase sarkarnama
मुंबई

शिंदे-फडणवीस यांचे हे 'स्कुटर सरकार'; हँडल मात्र, मागे बसलेल्याच्या हातात...

Umesh Bambare-Patil

मुंबई : राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा त्याला तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले सरकार म्हणून संबोधले. मात्र, काल महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. ही दोन चाकांची स्कूटर आहे. या सरकारमध्ये पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे, तो जिथे हवी तिथे स्कूटर घेऊन जाईल, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना महेश तपासे यांनी विविध विषयांवर भाष्य करत पक्षाची भूमिका मांडली. शिवसेनेचे बंडखोर आमदार काहीही म्हणत असले तरी उद्धव ठाकरे साहेबांचीच खरी शिवसेना आहे. बंडखोर आमदारांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची माफी मागितली पाहीजे, असेही महेश तपासे यावेळी म्हणाले.

आदरणीय शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. एकीकडे मविआ सरकार गेले. हे सरकार जात असताना एकीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल परब यांना ईडीच्या नोटीसा गेल्या. तर आता पवारसाहेबांना आयकर विभागाची नोटीस गेली आहे. हा योगायोग की ठरवून राजकीय षडयंत्र करण्यात येत आहे, हे पाहावे लागेल.

देशपातळीवर ज्या - ज्या विरोधी पक्षाच्या लोकांनी भाजपविरोधात आवाज उचलला त्या ममता बॅनर्जी, केजरीवाल, राहुल गांधी असतील या सर्वांना केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून नोटीसा पाठविल्या जात आहेत. पवारसाहेब हे या नोटीशीचे समर्पक उत्तर देतील याबाबत आम्हाला शंका नाही, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.

नवीन सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मेट्रो कारशेड आणि जलयुक्त शिवार बाबत निर्णय घेण्यात आले. ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे नेले होते. त्याला पुनश्चः आरेमध्ये नेण्याचा आदेश फडणवीस यांच्या माध्यमातून महाधिवक्त्यांना देण्यात आला आहे. आरेचे जंगल तोडण्यास पर्यावरणवादी आणि मुंबईकरांचा विरोध आहे. मुंबईचे फुफ्फुस वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने चांगला निर्णय घेतला होता असेही महेश तपासे म्हणाले.

जलयुक्त शिवार योजनेसंबंधीही काल आदेश देण्यात आले आहेत. कॅगने अनेकवेळा या योजनेवर ताशेरे ओढलेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करुनही महाराष्ट्रातील जमिन ओलिताखाली आलेली नाही. तरीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे असाही आरोप महेश तपासे यांनी केला. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांच्याबाबतीत आज जो निर्णय दिला हा निर्णय स्वागतार्ह असून संपुर्ण भाजपने देशाची माफी मागितली पाहिजे, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. या वेळी प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT