Threat to Leaders : Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Threat to Leaders : पवारांपासून, गडकरी अन् केजरीवालांपर्यंत नेत्यांना धमकीचे फोन; कारण काय?

Sharad Pawar : नेत्यांनाच धमकी, कायद्याचं राज्य कुठे आहे?

Chetan Zadpe

Threat to Leaders : गेल्या काही दिवसात राजकारणात सक्रिय असणाऱ्या राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकी येण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांना फोनद्वारे, पत्रांद्वारे धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा, तसेच महापालिकांच्या निवडणुकांसाठी अनेक राजकीय पक्ष, राजकीय नेत्यांची लगबग सुरू आहे. मात्र, या धामधुमीत धमक्या येण्याचे प्रकार वाढल्याने, नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अनेक राजकीय नेत्यांना फोनद्वारे आणि पत्रांद्वारे धमकी आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांपसून ते राज्य व स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा समावेश आहे. विशेषत: यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांनाचा समावेश आहे. आागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal), भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना गेल्या काही दिवसात धमकीचे फोन आले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12. 55 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली पोलिसांना कॉल करत केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली होती. पोलीस या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, भाजपचे नेते शेलार यांना धमकीचे पत्र आले होते. त्यामध्ये शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शेलारांनी बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती. शेलार यांना 27 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या कार्यालयातील टपालामध्ये एक निनावी पत्र आढळून आले होते. त्या पत्राच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. शेलार यांनी याबाबत बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गडकरी यांना अज्ञात व्यक्तीने तीन वेळा कार्यालयात निनावी फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण आंतरराष्ट्रीय डॉन असल्याचे सांगितले होते. त्याने गडकरी यांना 100 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गडकरींना धमकीचा फोन बेळगावच्या तुरुंगातून आल्याचे स्पष्ट झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी फोन करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर ती व्यक्ती सापडली होती. त्या व्यक्तीने घरातील भांडणामुळे पवारांना फोन केल्याचे कबूल केले होते.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अबू आझमी यांच्या खासगी सचिवाला धमकीचा कॉल आला होता. औरंगजेबाबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत फोन करणाऱ्याने आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, ग्रामपंचायत उमेदवार कांताबाई साळवे यांना एका चिठ्ठीत नावांचा थेट उल्लेख करून धमकी दिली गेली होती. उमेदवाराच्या घरावर अज्ञाताकडून ही धमकी देणारी चिठ्ठी चिकटवली होती. तुळजापुर तालुक्यात मसला खुर्द या गावी ही घटना घडली.

राजकीय नेत्यांना देण्यात येणाऱ्या धमक्यांमागे प्रसिद्धी मिळवणे हा मोठा हेतू असतो. तसचे मोठ्या नेत्यांना धमक्या दिल्यामुळे प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी मिळते, त्याचा उपयोग सामन्य नागरिकांमध्ये आपली दहशत माजवण्यासाठी केला जातो. तर काही गुडांकडून तुरुगांतून थेट नेत्यांना फोन आले आहेत. त्यामुळे तुरुंगातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे आला आहे. यामुळे धमक्या देण्याऱ्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. या धमक्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे पोलिसांवरील ताणही वाढत आहे, पण या प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT