Tiger Shroff shooting Sarkarnama
मुंबई

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफवरील गोळीबारात जखमी उमेश चौहान यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Tiger Shroff firing incident : गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चौहान यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू; सध्या तातडीच्या शस्त्रक्रियेऐवजी औषधोपचार आणि वैद्यकीय निरीक्षणावर भर.

Pradeep Pendhare

Tiger Shroff shooting : अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेले ब्लॉगर उमेश चौहान यांची प्रकृती स्थिर आहे. परळ येथील केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून, यकृतातील रक्तस्राव थांबला आहे. सध्या तातडीच्या शस्त्रक्रियेऐवजी औषधोपचार आणि वैद्यकीय निरीक्षणावर भर देण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

उमेश यांच्या प्रकृतीबाबत केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाने सोमवारी वैद्यकीय माहिती दिली. यकृताला झालेल्या दुखापतीनंतर सध्या पुढील रक्तस्राव होत नसल्याने डॉक्टर (Doctor) त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर सामान्य शस्त्रक्रिया विभागातील अतिदक्षता कक्षात डॉ. रामलाल पी. प्रजापती यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉ. प्रजापती आणि डॉ. उदय जाधव यांनी संयुक्तपणे त्यांची तपासणी केली.

उमेश चौहान हे मानखुर्द येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते आठवडाभर मिळेल ती मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी मित्र किसान राजभर याच्यासोबत ब्लॉगिंग करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दोघांची स्वतःची ब्लॉगिंग संकेतस्थळे असून, त्यावर ते चित्रफिती प्रसिद्ध करतात. उमेश यांच्या पत्नी आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यांना पाच वर्षांचा मुलगाही आहे. अशा परिस्थितीत गोळीबाराच्या घटनेत उमेश जखमी झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

उमेश यांचे मित्र किसान राजभर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ चित्रण केल्यानंतर दोघेही परतत होते. त्यावेळी टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी येत असलेल्या ठिकाणी ते थांबले. टायगर दर रविवारी तेथे येतो आणि चाहत्यांसोबत छायाचित्रे काढतो, अशी माहिती मिळाल्याने त्याला पाहण्यासाठी दोघेही गेले होते. मात्र, त्याचवेळी अचानक गोळीबार सुरू झाला. सुरुवातीला फटाके फुटल्याचा किंवा वाहनाचा टायर फुटल्याचा आवाज असल्याचा त्यांचा समज झाला. काही क्षणांतच हा गोळीबार असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

गाडीच्या काचा फुटल्या

गोळीबारादरम्यान वाहनाच्या काचा फुटल्या. काचांचे तुकडे किसान राजभर यांच्या डोक्यालाही लागले. गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेत उमेश चौहान यांना गोळी लागून दुखापत झाली.

जखमींचा रिक्षातून प्रवास

जखमी उमेश यांना किसान यांनी रिक्षातून कूपर रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार आणि वैद्यकीय निरीक्षण सुरू आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे उमेश यांच्या कुटुंबाची चिंता वाढली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT