Mumbai News, 08 Dec : विधानसभा निवडणुकीतील पराभवाननंतर उद्धव ठाकरेंनी आपलं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) निवडणुकीवर केंद्रीत केलं आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच डावपेच आखायला सुरूवात केली आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
कारण महायुतीला पूरक भूमिका घेणाऱ्या मनसेच्या (MNS) घाटकोपरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. घाटकोपर पूर्व विधानसभेतील मनसेचे प्रभाग क्रं. 133 चे माजी शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे, सुनील भोस्तेकर आणि प्रभाग क्रं. 125 चे सतीश पवार यांच्यासह जवळपास 300 ते 400 मनसैनिकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे हातात शिवबंधन बांधून स्वागत केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आलेल्या महिला निरीक्षकांची बैठक मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ठाकरेंनी नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसमोरआगामी निवडणुकीची दिशा कशी असणार याबाबत मार्गदर्शन केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "नुकताच आठ ते दहा दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतरही तुम्ही शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहात. तिकडे जल्लोष सुरू असतानाही तुम्ही इकडे येत आहात. पण जे जिंकले आहेत त्यांच्याकडे जल्लोषच नाही. याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच नाही. कारण त्यांच्या विजयात काहीतरी घोटाळा आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा आहे.
तुम्ही सगळे योग्य वेळेला एकत्र आला आहात. ज्यांच्या जिव्हारी पराभव लागतो तेच इतिहास घडवू शकतात, उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. तसंच महायुतीवर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे. एक है तो सेफ है असं म्हणतात. मला हाच प्रश्न मराठी माणसांना विचारायचा आहे की, उद्याची मुंबई आपली राहणार आहे का ? आपल्या हक्काची मुंबई ओरबाडली जात असताना आपण षंढ म्हणून गप्प बसणार आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यात सध्या चोरांचे आणि दरोडेखोरांचे राज्य आहे म्हणत सत्ताधाऱ्यांना डिवचलं आणि मनसेला टोला लगावला. ते म्हणाले, तुम्ही कुठल्या पक्षातून आला आहात त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही, मात्र पक्ष स्थापन केल्यानंतर हेतू आणि दिशा लागते. तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात त्या मेहनतीला काहीच अर्थ राहत नाही, असं म्हणत मनसेला डिवचलं.
तर, शिवसेना एकच आहे ती निवडणूक आयोगाला कोणाला देण्याचा अधिकार नाही. निशाणी बदलली आहे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो, जे सर्व्हे आपल्या बाजूने होते. पण निकाल काही वेगाच आला. हे चोरांचे आणि दरोडेखोरांचे राज्य आहे. ठिणगी तर पडली आहे मात्र आता तुम्हा सगळ्यांना झोकून द्यावे लागणार आहे, असं ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.