Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Jalna Maratha Protest : दुतोंडी सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस-पवारांवर हल्लाबोल

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : एकीकडे गोळीबार, लाठीमार करून डोकी फोडायची, दुसरीकडे मराठा समाजाच्या वेदनांची जाण आहे असे सांगत माफी मागायची. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज आणि गोळीबार होऊच शकत नाही, असा आरोप करत ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मराठा आंदोलनाने दुतोंडी सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडल्याचा हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दात समाचार घेताना उपमुख्यमंत्री अजित पवारांसह भाजप नेते नितेश राणे आणि मोदी-शाहांवरही निशाणा साधला आहे. (Latest Political News)

जालन्यातील आंदोलनाची धग राज्यभर पोहचल्यानंतर मुख्यमंत्री पोपटपंची करतात, अशी टीका केली आहे. मुखपत्रात म्हटले, 'मराठा समाजाच्या वेदनांची पूर्ण जाण असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यांनी आधी पोपटपंची बंद करावी आणि जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळ्या चालवण्याचे, लाठीमाराचे आदेश कोणी दिले ते सांगावे. एका तोंडाने आंदोलकांवर लाठ्या–गोळ्या चालवायच्या व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण असल्याचे सांगायचे. हे शिंदे-फडणवीस-पवारांचे ढोंग असून त्यांचा बुरखा मनोज जरांगे–पाटलांनी फाडला आहे.'

पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पोलिसांनी फक्त पालन केले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. सत्तेतील अनेकांनी जरांगे यांची भेट घेऊन सरकार आरक्षणासाठी काय-काय करते आहे, याची माहिती दिली. जरांगेंनी खिशातून बंदुकीची गोळी काढून त्यांना दाखवत सरकार काय करते हे सांगितले.

दिल्ली विधानसभेवर ताबा मिळविण्यासाठी मोदी सरकारने जी धडपड केली तीच तत्परता मराठा आरक्षणासाठीही केंद्राने करावी, असे आव्हानही मुखपत्रातून देण्यात आले आहे. यावेळी नितेश राणेंनी पूर्वी भाजपवर केलेल्या टीकेचा उल्लेख करून राणेंचीही कोंडी केली. मराठा समाजाने आता उपमुख्यमंत्री पवार यांनाही इशारा दिल्याचे नमूद केले आहे. ‘फडणवीसांच्या सरकारमधून लगेच बाहेर पडा, नाहीतर परिणामांना सामोरे जा’ हा इशारा पवारांना देण्यात आला आहे.

गोळीबार व लाठीमार ही देवेंद्र फडणवीस यांची दोन प्रमुख शस्त्रे असल्याचा घणाघात करण्यात आला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना भीमा-कोरेगावची दंगल पेटली असताना ते हात चोळत बसले होते. रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या कोकणी जनतेवरही पोलिसांनी डोकी फोडली होती. देहूमध्ये वारकऱ्यांवरही त्याच निर्घृण पद्धतीने हल्ले झाले. या सरकारचे डोके फिरले आहे व त्यांना फक्त लाठ्याच चालवत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT