Mumbai News: मोदी सरकारनं त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये अयोध्येतील राममंदिराचा निर्मितीचा मोठा मुद्दा मार्गी लावला. मोठ्या जल्लोषात या राममंदिराचं लोकार्पण करण्यात आलं होतं. यानंतर अयोध्येत दर्शनाला येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. याचदरम्यान, याच राममंदिरातील दानपेटीतून पाच कोटींचा अपहार झाल्याच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार व फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता.12) पत्रकार परिषदेत सर्वांनाच धक्का देणारी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी अयोध्येतील पाच कोटींच्या अपहारावर भाष्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ असून त्यांची आणि आमची चर्चा झाली आहे. बहुतेक आपल्याला प्रभू श्रीरामांचे बोलावणं आहे. याच धर्तीवर उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत ५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक असल्याचं मत संजय राऊत यांनी सांगितलं आहे. पण अयोध्येतील श्रीराममंदिराच्या दानपेटीला हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्त्ववादी करू शकला, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत.त्यांची आणि आमची चर्चा झाली. बहुतेक आपल्याला श्रीरामाचं बोलावणं आहे. अयोध्येत आम्ही यावे आणि पाच कोटींच्या गैरव्यवहाराच्या त्या विषयाला तोंड फोडावे,असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तसेच शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या कामासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश राम मंदिर ट्र्स्टला दिला होता अशी आठवणही यावेळी खासदार राऊतांनी करुन दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या दानपेटीचे चोर कोण? सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आलं? ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा हे का गप्प आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा मुद्दा तापवला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राम मंदिरातील दानपेटी वादावर गोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी भाष्य केलं होतं. त्यांनी राममंदिरातील दानपेटीतील गैरव्यवहाराची माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. पण ही मोठी माणसे आहेत, त्याबद्दल बोललो तर जीवाला धोका निर्माण होईल, असं खळबळजनक विधान केलं होतं.
याच त्यांच्या विधानाचा संदर्भ देत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले,बृजभूषण सिंह यांच्यासारख्या बाहुबलीला भीती वाटते हा अत्यंत गंभीर विषय आहे. पण आम्ही लवकरच अयोध्येला जाणार असल्याचं ठणकावून सांगितलं. या अयोध्या भेटीदरम्यान,उद्धव ठाकरे हे राम मंदिरातील वादाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते व माजी खासदार बृजभूषण सिंह यांची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत यांनी घणाघाती टीका करतानाच हे लोक राम मंदिरात चोऱ्या करु शकतात,यांना राम मंदिरातील दानपेटीतील ५ कोटी चोरताना भीती वाटत नसेल का, अशी विचारणा केली आहे. त्यांनी तुम्ही उठसूठ अतिरेक्यांपासून राम मंदिराला धोका आहे म्हणता, मग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारे अतिरेकी कोण आहेत,असा उद्विग्न सवालही उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.