

Illegal Sex Determination Racket Maharashtra : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, या धक्कादायक रॅकेटचे धागेदोरे आता नाशिकनंतर थेट पुणे आणि कर्जतपर्यंत पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी मोठी कारवाई करत पुण्यातील वाघोली येथील डॉक्टर अतुल जाधव याला अटक केली असून, कर्जतमधील मुख्य एजंट राम किसन पवार यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
या ताज्या कारवाईनंतर या आंतरजिल्हा गर्भलिंग निदान रॅकेटमधील अटक आरोपींची संख्या तब्बल 21 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सात डॉक्टरांचा (Doctor) समावेश असल्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 16 जूनपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिसांकडून रॅकेटची मुळे उपटण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.
तपासादरम्यान पुण्यातून (Pune) यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत वाघोली येथील डॉ. अतुल जाधव याचे नाव समोर आले. श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने पुण्यात जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत हा डॉक्टर स्वतः सोनोग्राफी मशीन वापरून बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी नगर तालुक्यातील हातवळण शिवारातील एका झोपडीतून अटक करण्यात आलेला श्रीगोंद्याचा मेडिकल चालक जालिंदर बोरुडे याच्याकडून पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. तो स्वतः डॉक्टर नसतानाही अनेक गर्भवती महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
याच काळ्या धंद्यात राम किसन पवार उर्फ तपोश शिबू सरकार (रा. मलठण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा मुख्य एजंट म्हणून काम करत असल्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कर्जतमध्ये छापा टाकत त्याला अटक केली. विशेष म्हणजे आरोपीच्या ताब्यातून बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, लोणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे आणि त्यांचे विशेष पथक या गुन्ह्याची संपूर्ण पाळेमुळे शोधून काढण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवत आहेत.
या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये आतापर्यंत सात डॉक्टर, तीन मेडिकल चालक, एक वैद्यकीय साहित्य पुरवठादार, एजंट आणि महिलांच्या नातेवाईकांसह एकूण 21 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यांतून बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाच अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन जप्त केल्या आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या चार चारचाकी आणि एक दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यभरात बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या वाढत्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.