Uddhav Thackeray, Iqbal Singh Chahal, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

BMC Politics : ठाकरेंसोबत ब्रेक-अप, शिंदेंसोबत पॅच-अप अन् चहलसाहेबांचा नवा गेट-अप

Jui Jadhav

BMC Political News :

घर बदललं की वासेही फिरतात अशी मराठीत म्हण आहे. ही म्हण आता सर्वांना आठवत आहे. कोरोनाकाळात ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इक्बाल चहल यांना मुंबई महापालिकेत आणलं तेच चहल आज त्यांच्यापासून दुरावले आहेत. सत्तांतरनाट्यानंतर चहल वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कोडकौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे चहलसाहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यशैलीच्या प्रेमात बुडलेले दिसत असल्याची चर्चा आहे.

मुंबईकरांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता. मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल (Iqbal Singh Chahal) यांनी बजेट सादर केलं. यावेळी एक गोष्ट प्रकर्षानं सर्वांच्या लक्षात आली, ती म्हणजे चहलसाहेब सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख करत होते. मात्र, हे आताच घडलेलं नाही. दीड वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि चहलसाहेबही बदलले.

कोरोनाकाळात प्रवीण परदेशी (Pravin Pardesi) मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. पण ते तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे असल्याने त्यांच्या जागी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इक्बाल चहल यांना आणलं. ही घटना मे 2020 मधील. तेव्हा चहलसाहेबांची प्रतिमा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विश्वासातील अधिकारी अशी होती.

पण, जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, महाविकास आघाडीची सत्ता गेलीआणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तसे चहलसाहेबही बदलले. मुंबई महापालिकेची निवडणूक न झाल्याने ते आयुक्त नसून प्रशासक म्हणून काम करत आहेत. आणि सर्वाधिकार त्यांच्याकडे असल्याने ते अनेक निर्णय मुख्यमंत्री शिंदेंच्या फेवरमध्ये घेत असल्याची टीका होत असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अलीकडेच चहल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुंबईत हवेची गुणवत्ता घसरल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून साफसफाई करू लागलेत. मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन ड्राईव्हचे चहल यांनी अगदी तोंड भरून कौतुक केलंय. ही बाब सर्वांच्याच लक्षात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाहिलं तर लक्षात येईल की, शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) चहल यांच्यावर टीका करत आहेत. रस्त्याची कामे असोत की महापालिकेचा कारभार असो, आदित्य ठाकरे त्यांच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत.

IAS इक्बाल चहल यांनी कोरोनाकाळात मोठी कामगिरी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्या विश्वासानं तेव्हा त्यांना मुंबई महापालिकेत आणलं तेव्हापासून पावणेचार वर्षे ते एकाच पदावर आहेत. आज ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT