Uddhav Thackeray Group : Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Group : महाविकास आघाडीत ठाकरे गट 'मोठा भाऊ' ; लोकसभेच्या 23 जागा लढवणार?

Mahavikas Aghadi News : ठाकरेंचे मित्र आंबेडकर-शेट्टी यांनाही जागा सोडाव्या लागणार...

सरकारनामा ब्यूरो

संजय परब -

Mumbai News : महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मोठा भाऊ असून आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या भावाप्रमाणे जागावाटपात सुद्धा ठाकरे गट मोठा असून, लोकसभेच्या किमान २३ जागा ते लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापैकी आपल्या वाट्यातील एक ते दोन जागा महाविकास आघाडीतील छोट्या समविचारी पक्षांना देतील. यात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी तसेच राजू शेट्टी यांच्या शेतकरी स्वाभिमान संघटनेचा समावेश असू शकतो. याचबरोबर महाविकास आघाडीतील धाकटे भाऊ काँग्रेसला १५ तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा जाऊ शकतात. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याच्यावर वर्षाच्या शेवटी शिक्कामोर्तब होईल. काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूर दौऱ्यावर येत असून यावेळी ते राज्यातील आपल्या प्रमुख नेत्यांशी बोलणी करतील. मग दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल. पण, सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला १५ जागा मिळू शकतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाचा विचार करता राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजप, १८ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. तर राष्ट्रवादीला ५ काँग्रेस आणि एमआयएमने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. मात्र पाच वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले.

पक्षात येता का तुरुंगात जाता, असे ईडीमिश्रित भय दाखवत भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असे विरोधकांनी नेहमीच आरोप केला. यामुळे दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी होत मोठी उलथापालथ झालीय. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात नव्याने उभी राहिल्याने लोकसभा निवडणुकीत जोरदार धुमश्चक्री होईल. या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आपल्या जागा टिकवणे फार कठीण जाणार आहे.

मागच्या वेळी निवडून आलेल्या शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदारांनी शिंदे यांचा झेंडा हाती घेतला असून उद्धव ठाकरे यांच्याकडे आता विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर असे मोजून पाच खासदार शिल्लक आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना आपल्या मागच्या जागा सुद्धा राखणे हे हिमनगाचे टोक गाठण्यासारखे असेल.

आर्थिक ताकद, मनुष्यबळ याचा विचार करता केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या जवळपास सुद्धा ते जात नाहीत. एकनाथ शिंदे यांची ताकद मर्यादीत असली तरी भाजप त्यांच्या मागे आहे आणि अजित पवार सुद्धा सोबत असल्याने तीन इंजिनच्या या सरकारला रोखणे हे कठीण काम आहे. यात एकमेव आधार आहे तो म्हणजे लोकांची सहानभूती. तोडाफोडीच्या भाजपच्या राजकारणाला आणि ईडीची भीती दाखवून विरोधी पक्षच संपवून टाकण्याच्या कारस्थानाला लोकांनी विरोधी मतदानातून उत्तर दिले तरच उद्धव यांची शिवसेना टिकू शकते. मातोश्रीला सुद्धा तीच आशा आहे.

बई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सतत पुढे ढकलत जात असलेल्या निवडणुका या विरोधकांना सहानुभूतीचा फायदा मिळू नये, या भाजपच्या डावपेचाचा एक भाग आहे. तर अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार यांच्याकडे पाचपैकी सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि अमोल कोल्हे असे तीन खासदार उरले आहेत. पश्चिम महाराष्ट्र सोडल्यास शरद पवार यांची ताकद मर्यादित असली तरी पवारांना महराष्ट्राचा कानाकोपऱ्याची खडानखडा माहिती असून कोणाला कधी कात्रजचा घाट दाखवायचा यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. भाजपने विश्वासघात केल्याने ते आता मोठ्या ताकदीने पुढे सरसावले असून महाविकास आघाडीच नव्हे तर इंडिया आघाडीला ते नवी दिशा दाखवू शकतात.

या पडझडीत काँग्रेस अजून तरून असली तरी भाजप कोणत्याही थराला जाऊन होत्याचे नव्हते करू शकते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लौकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगत भाजपने एकच खळबळ उडवून दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या अफवा भाजपकडून सोडल्या जात आहेत. याला कंटाळून आता यावर आपले स्पष्टीकरण देणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. मात्र भाजप आता काँग्रेस फोडण्याच्या तयारीत आहेत, हे मात्र निश्चित. काही होऊदे, पण यावेळी महाराष्ट्रातून ४८ पैकी ४५ जागा मिळवायच्या असा निर्धार भाजपने केला असून प्रसंगी ते शिंदे आणि अजितदादा यांच्या उमेदवारांना हाती कमळ घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरायला सांगतील. तशी त्यांनी तयारी सुद्धा केली आहे.

या सगळ्याचा विचार करता महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान असून लोकसभेचा निकाल नंतर विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम करू शकतो. यामुळे आताच भाजपला लगाम घालण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुढे सरसावले असून राज्यातील वातावरण ते राहुल गांधी यांना नीट समजावून सांगत पुढचे पाऊल टाकतील. आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्या पक्षाचा सहभागाचा मोठा वाटा असणार असून अकोला आणि हातकंणगले या दोन जागा त्यांना देऊन मग पूर्ण राज्यात त्यांच्या मर्यादित पण प्रभाव पडू शकणाऱ्या ताकदीचा ते वापर करू शकतील.

उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीला आपल्या सोबत घेतले असून विधानसभेला ही आघाडी त्यांना महत्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीसोबत डाव्या पक्षांची आघाडी असून. यात वंचित आणि स्वाभिमानिसह डावे पक्ष, जनता दल समाजवादी, शेकाप आदी पक्ष आहेत. लोकसभा जागा वाटपात वंचित आणि स्वाभिमानी यांचा विचार होईल. मात्र इतर छोट्या पक्षांना आघाडी आपल्यासोबत ठेवेल. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा महाविकास आघाडीला सोडाव्याच लागणार आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT