Mumbai News : भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला.तसेच त्यांच्यात काहीवेळ संवादही साधला. ही चर्चा युतीसंदर्भात असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप नेते पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी खासदार विनायक राऊत सोबत होते. यावेळी ठाकरे हे काहीसे पाठीमागे होते. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकात पाटीलही (Chandrakant Patil) या सोहळ्याला दाखल झाले.
विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात काहीक्षण संवाद झाला. यावेळी नार्वेकर यांनी पाटील यांच्या कानात युतीचं काय,कधी युती करताय अशाप्रकारची कुजुबुज केली. त्यावर तितक्याच मिश्किलपणे टिप्पणी करत चंद्रकांत पाटलांनीही पुन्हा भाजप-शिवसेना युती हा माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल असं प्रत्युत्तर दिलं. आणि या दोन्ही नेत्यांमध्ये एकच हशा पिकला.
उद्धव ठाकरे यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिलेच, शिवाय भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशीही काहीवेळ चर्चा केली. यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीची चर्चा जोरदारपणे सुरु झाली आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. एक तर तू राहशील नाहीतर मी राहील,अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड थोपटणाऱ्या ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क काढले गेले.
त्यातच आदित्य ठाकरेंनीही फडणवीसांची भेट घेत आपल्या मतदारसंघातल्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. विशेष म्हणजे दावोस दौर्यावरुनही एकनाथ शिंदेंना टोला लगावत फडणवीसांचं आदित्य ठाकरेंकडून कौतुकही करण्यात आलं होतं.
तसेच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अंधेरी येथील मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता. यावरुनही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.
अशातच महायुतीत एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांशी जवळीक साधण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात सत्तेमध्ये दिसतील असा खळबळजनक दावा केला होता.
आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीचं प्रचंड बहुमतातलं सरकार सत्तेत आहे. तर विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारा आकडाही नाही. त्यामुळे काँग्रेस वगळता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेतील भाजपशी जुळुन घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.