Milind Narvekar : भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी टि्वट करीत शहा यांना शुभेच्छा दिल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
ठाकरे-भाजप संघर्ष जगजाहीर आहे. 'अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद,' यावरुन ठाकरे-शहा मध्ये झालेला संवाद, त्यानंतर राज्यात स्थापन झालेले आघाडी सरकार, या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनी शहांना वाढदिवसांच्या दिलेल्या शुभेच्छा हे केवळ निमित्त नसून ही नवीन राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना?, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे. केवळ मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली. तेव्हापासून हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहे.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत संवाद साधण्यासाठी नार्वेकरांकडून हा प्रयत्न केला जात आहे का, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
"भाजपशी गद्दारी करणाऱ्या ठाकरेंना जमीन दाखवा," असे आव्हान अमित शहांनी काही दिवसापूर्वी मुंबईत कार्यकर्त्यांना केले होते, त्याला ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले."भाजपला आस्मान दाखवू," असे ठाकरे म्हणाले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले रवी म्हात्रे हे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या जवळ जात असल्याचे दिसून आले. म्हात्रेंच्या वाढलेल्या वजनामुळे नार्वेकर पक्षात नाराज झाले असावे, अशी चर्चा ठाकरे गटात दबक्या आवाजात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमावरुन मिलिंद नार्वेकरांच्या आजच्या ट्विटकडे पाहिले जात आहे.
उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक तसेच शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, अमित शहाजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वशक्तिमान देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो.
भाजपने शिवसेनेत फूट पाडल्यानंतर ठाकरे-भाजप यांच्यातील विस्तवाला हवा देण्याचे काम तर यानिमित्ताने होत नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे-शहा यांच्यात होत असलेले शाब्दीक युद्धानंतर नार्वेकरांनी हे टि्वट कशासाठी केले,हे राजकीय पंडितच सांगू शकतील..
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.