Uddhav Thackeray & Family Sarkarnama
मुंबई

Thackeray Voting to Congress : उद्धव ठाकरेंनी आघाडीधर्म निभावला; प्रथमच केले काँग्रेसला मतदान...

Vijaykumar Dudhale

Mumbai, 20 May : लोकसभेचा पाचवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज (ता. २० मे) राज्यात मतदान होत आहे. विशेषतः मुंबई आणि परिसरातील दहा जागांचा आणि नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात येते, हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे, त्यामुळे उद्वव ठाकरे यांनी आघाडीचा धर्म निभावत प्रथमच काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या समोरील हाताचे बटण दाबत काँग्रेसला प्रथमच मतदान केले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, तसेच तेजस ठाकरे ह्यांनी वांद्रे येथील कला नगर परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माध्यमांशी बोलताना मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘मुंबईसह (Mumbai) इतर सर्व ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा’, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election) मतदान होत आहे. यामध्ये मुंबईमधील दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मुंबई या सहा मतदारसंघाबरेाबरच शेजारच्या ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर, तसेच नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप प्रथमच एकत्र नाहीत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष युतीमध्ये एकत्र होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना केली. शिवसेना सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आहे. आघाडी करूनच हे तीनही पक्ष लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

मातोश्री हे उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात येते. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला असून काँग्रेसकडून आमदार वर्षा गायकवाड निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत हा मतदारसंघ भाजपकडे असायचा, त्यामुळे ठाकरे हे कायम भाजपला मतदान करायचे. पण या वेळी प्रथमच आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना मतदान केले. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपकडून या वेळी पूनम महाजन यांच्या ऐवजी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम निवडणूक लढवत आहेत.

पैशाचा पाऊस कोणी स्वीकारणार नाही : ठाकरे

मतदानानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील जनता जुमलेबाजीला त्रासलेले आहेत. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी देशभरातील नागरिक घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क यापुढेही अबाधित राहावा, यासाठी या वेळी मतदान करीत आहेत. पैशाचा पाऊस आता कोणी स्वीकारणार नाहीत आणि पैसे घेऊन कोणी आपले आयुष्य विकायला तयार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT