Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : सरकारला भित्रट म्हणत, उद्धव ठाकरेंनी आंदोलन अधिक पेटतं केलं; आता चौकाचौकात...

Pradeep Pendhare

Mumbai News : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला नकार दिल्यानंतर महाविकास आघाडी आज बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण राज्यातील रस्त्यावर उतरले आहे. राज्यभर आंदोलन करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली मुंबईत आंदोलन झाले.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी शैलीत राज्य सरकारच्या भित्रटपणावर टीका केली. तसंच आंदोलन पेटतं ठेवण्यासाठी राज्यभरातील चौकाचौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा आवाहन केलं. महाराष्ट्रात कडकडीत बंद होईल, याच भीतीने चेलेचपाट्यांना कोर्टात पाठवल्याची टीका करत उद्धव ठाकरेंनी सरकारला भित्रट म्हटले.

मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थित बदलापूर अत्याचा घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. भर पावसात हे आंदोलन झाले. निषेधासाठी तोंडावर आणि हाताच्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्य होत्या. उद्धव ठाकरे यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

"सरकारमध्ये हिंमत नव्हती. आजचा महराष्ट्र बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला होती. या संकटांचा सामना करण्याची हिंमत आणि ताकद सरकारमध्ये नाही. त्यामुळे चेलेचपाट्यांना कोर्टात पाठवले. महाराष्ट्र बंदला अडथळे निर्माण केले. कोर्टाचे अभिनंदन करतो त्यांनी देखील त्वरेने आणि तत्काळ दखल घेत निर्णय दिला. पण सरकारला आता कळले की, तुम्ही बंदला बंदी घातली, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयात, घरामध्ये अत्याचाराविरोधात मिंधे सरकारविरोधात एक मशाल धगधगते आहे", असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील हा बंद महिला, बहीण, मातेला, मुलींना सुरक्षा पाहिजे, म्हणून होता. तुम्ही त्याला अडथळा आणला. गेल्या आठवड्यात 21 आणि 22 तारखेला भारत बंद झाला होता, तो आपल्या राज्यात जाणवला नाही. इतर राज्यात रेल्वे सेवा देखील कोलमडली होती. त्यावेळी याचिकाकर्ते कोठे गेले होते. बंदला का विरोध केला गेला नव्हता. या नराधमाला, अत्याचाराला पाठिशी घालणारे हे याचिकेकर्ते तेवढेच भित्रड आहेत. महिलावर अत्याचार करेल, त्याला शिक्षा झालीचा पाहिजे, त्यापेक्षा त्यांच्या पापावर पांघरून घालणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मराठा समाजाचा विषय, एसटीचा विषय असेल, काही माणसं राज्यकर्त्यांची 'सदा आवडती' झाली आहेत. ही 'सदा आवडते' लोक कोण हे तुम्हाला माहिती आहे, काय लायकी आहे, तुम्हाला माहिती आहे. तु्म्ही जे केले, ते शोभा देणारे नाही, तुम्ही यात राजकारण आणलत, आज संपूर्ण घरातील महिला जाब विचारत आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

कंस मामा भाचीच्या सुरक्षितेच्या आड

बहीण सुरक्षित, तर घर सुरक्षित, आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजेत, या घटनांवरील चिडून उठलेले आहे, रोज कोठे ना कोठे काही घडत आहे. हे कंस मामा आपल्या भाचीला न्याय कधी देतोस? असा सवाल करत हे सगळे कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत. बहिणीवर एका बाजूला अत्याचार होतोय, आणि हे राख्या बांधत आहे. राख्या बांधण्यात कोठे अडचण येऊ म्हणून, आंदोलनात अडकाठी आणत आहात. अरे निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते, अशी देखील टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

स्वाक्षरी मोहीम; उच्च न्यायालयाचे लक्ष वेधणार

संस्कारक्षम महाराष्ट्रात हे विकृत सरकार आहे. हे आंदोलन विकृतीविरुद्ध संस्कृती असे आहे. या आंदोलनात एका बाजुला संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला विकृती, नराधम, त्यांच्यावर पांघरूण घालणारं विकृती सरकार, त्या नराधमाची बाजू मांडणारे विकृत याचिकाकर्ते, असा हा लढा आहे. त्यामुळे आवाहन करतो की, राज्यातील प्रत्येक चौकात स्वाक्षरी मोहीम राबवा, या स्वाक्षऱ्या गोळ्या करून उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत. बंद का करत होतो, हे दाखवून देऊ. आमचा आवाज बंद होणार नाही. तो अधिक मोठा होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT