Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

Chitra Wagh : महाविकास आघाडीच्या नेत्यांना सिब्बल चालतात मग निकम का नको ? चित्रा वाघ यांनी सगळंच काढलं

BJP Chitra Wagh accuses MVA of politics in Badlapur Rape Case : भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बदलापुरातील अत्याचारप्रकरणावर महाविकास आघाडीने राजकारण आणले म्हणून, चांगलेच धारेवर धरले.
Published on

Mumbai News : बदलापुरातील घटनेचा खटला राज्य सरकारने जलदगती न्यायालयात चालवण्याबरोबर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. महाविकास आघाडीने मात्र उज्ज्व निकम यांच्या नियुक्तीला हरकत घेतलीय. यावर भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उज्ज्वल निकम यांची पाठराखण करत, महाविकास आघाडीला खडे बोल सुनावले आहेत.

"सरकारी वकील म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कपिल सिब्बल चालतात, पण उज्ज्वल निकम चालत नाहीत. खैरलांजी, कोपर्डी, कोल्हापूर बालहत्याकांड, शक्ती मिलसारख्या अनेक दुर्दैवी घटनांमध्ये पीडित महिलांच्या बाजूने लढत नराधमांना कठोरात कठोर शिक्षा ज्यांनी दिली, ज्यांनी आत्तापर्यंत एकाही गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतले नाही ते उज्ज्वल निकम आता या मंडळींना अचानक का नकोसे झालेत?" या प्रश्नाचे उत्तर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीकडे मागितले.

चित्रा वाघ यांनी बदलापुरातील अत्याचारप्रकरणावर मुंबई भाजप (BJP) कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी याप्रकरणात राजकारण आणले म्हणून, चांगलेच धारेवर धरले. त्या म्हणाल्या, "बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत". बदलापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होणार, महायुती सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वाघ यांनी दिली. यावेळी चित्रा वाघ यांनी अनेक दाखले देऊन मविआ नेत्यांच्या बदलापूर प्रकरणातील दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले.

Chitra Wagh
Maharashtra Politics : उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला 'दे धक्का'; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत दिला 'हा' मोठा निर्णय

माणुसकीला लाजवेल अशा बदलापूरच्या प्रकरणात विरोधकांकडून महायुती सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर होत असलेल्या टीकेला वाघ यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, "याप्रकरणात एसआयटी (SIT) नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरु केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले".

याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे. मात्र लहान मुलगी पोलिस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान 3-4 तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलिस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. लहानग्या मुलीला अजून शरीराची ओळख नाही, तिच्यासोबत नक्की काय घडलं हे तिच्याकडून जाणून घेण्यासाठी वेळ लागला, असा खुलासा पोलिसांकडून केला गेला आहे. असे असताना विरोधकांकडून या दुर्दैवी प्रकरणी राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले जात आहे, असा आरोप वाघ यांनी केला.

Chitra Wagh
Uddhav Thackeray : "बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका..."; अत्याचारांच्या घटनांचा पाढा वाचत उद्धव ठाकरे कडाडले

पवार, पटोले, शिंदे यांच्या विधानावर निशाणा

"बदलापूरच्या दुर्दैवी घटनेत आंदोलन, रेल रोको हे सगळे मुद्दाम ठरवून होते आहे का? याचा विचार सूज्ञ जनतेने करायला हवा. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो, असे वक्तव्य केले. त्यापाठोपाठ नाना पटोले, प्रणिती शिंदे हे आंदोलनाची धग अधिक पेटवण्याच्या प्रयत्नात दिसले. आंदोलनकर्त्यांच्या हातात, 'लाडकी बहीण योजना रद्द करा', असे फलक का होते? संवेदनशील प्रसंगावेळी या लोकांच्या हातात, असे बॅनर्स का होते? असा सवाल करत बदलापूर घटनेच्या आडून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा मविआच्या नेत्यांचा कट आहे", असा घणाघात वाघ यांनी केला.

ठाकरेंना हिंगणघाट प्रकरणाची करून दिली आठवण

बदलापूर प्रकरणात राजकारण करत महाराष्ट्र बंद पुकारणाऱ्या मविआच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना आठवून पहायला हव्यात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कित्येक माताभगीनींवर झालेल्या अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांची यादीच वाघ यांनी यावेळी दाखवली. हिंगणघाट येथे घडलेल्या महिलेला पेटविण्याच्या घटनेचे उदाहरण देऊन चित्रा वाघ यांनी मविआ सरकारवर शरसंधान साधले. बदलापूर प्रकरणीही लहानगीला न्याय दिला जाईल आणि नराधमाला फासावर लटकावले जाईल, असे विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com