Maharashtra Politics Latest News : 'काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता असते. काही शंकाकुशंकाबाबत खुलासा व्हावा, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. केवळ भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं की आमची विकेट काढायची, याला मोकळ्या वातावरणातल्या निवडणूक म्हणू शकत नाही, 'असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत तोफ डागली आहे.
'१९८७ मध्ये पार्ल्यात पोटनिवडणूक झाली होती. शिवसेनेचे डॉ. प्रभू विजयी झाले होते. भाजप त्यावेळी विरोधात निवडणूक लढला होता. ही पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने जिंकली होती. नंतर भाजप आमच्या सोबत आला. आमच्या पाच ते सहा आमदारांना बाद ठरवण्यात आलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकारही काढण्यात आला होता. हिंदुत्वाचा प्रचार केला, हे कारण दिलं होतं', असं म्हणत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'निवडणूक आयोगाने आचारसंहितेत काही बदल केले आहेत का? केले असतील तर आम्हाला अडचण नाही; पण हे बदल सर्वांना सारखेच असले पाहिजेत आणि ते सर्वांना वेळेत कळले पाहिजे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यात कर्नाटकही होते. तिथे पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय बोलून मतदानासाठी बटन दाबून जनतेला आवाहन केलं होतं. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मोठं आश्वासन दिलं. तुम्ही भाजपला निवडून दिलं तर अयोध्येला जाणाऱ्यांना रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ, असं अमित शाह म्हणाले. फक्त मध्य प्रदेशातीलच नव्हे तर देशातील जेवढेही रामभक्त आहेत, त्यांना त्यांच्या सोयीनुसार भाजपने त्यांना मोफत अयोध्यावारी घडवावी,' अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांकडे केली आहे.
'येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आहे. देशातील पाच ते दहा कोटी लोकांना तिथे आणलं जाणार आहे. असं नको रामभक्तांना जेव्ह वाटेल तेव्हा रामलल्लाचं दर्शन घडवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या अर्थाने बजरंग बली जय म्हणत मतदान करताना बटन दाबा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. निवडणूक आयोगाने हा नियम शिथिल केला असेल तर येत्या निवडणुकीत जनतेने जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो, गणपती बाप्पा मोरया म्हणत मतदान करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं', अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ज्यामुळे मतदानाचा अधिकार काढला होता तो योग्य होता? की आता पंतप्रधान आणि गृहमंत्री करताहेत ते योग्य आहे? निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं', असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आचारसंहितेत निवडणूक आयोगाने काही बदल केला असेल तर तो केव्हा केला आणि कधी केला? आणि तो केवळ भाजपलाच सांगितला, आम्हाला का नाही सांगितला? यावर आयोगाने स्पष्टीकरण द्यावं. आम्ही या संबंधी एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. निवडणुका संपण्यापूर्वी निवडणूक आयोगाने याबाबत देशातील सर्व राज्यांना माहिती द्यावी,' असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.