Mumbai News: शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानं 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. या बंडानंतर उद्धव ठाकरेंवर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हही गमावण्याची वेळ आली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवं नाव आणि मशाल या चिन्हासह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वात मोठं विधान केलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी(ता.11) ठाण्यातील एका कार्यक्रमात पक्षफुटीवर पहिल्यांदाच पश्चातापाची भावना व्यक्त केली.ते म्हणाले,शिवसेनेचे उपनेते,ठाण्याचे माजी महापौर दिवंगत अनंत तरे यांचं ऐकायला हवं होतं.त्यांचं ऐकलं असतं,तर शिवसेना फुटलीच नसती.आता पश्चाताप होत असल्याचं म्हटलं.
ठाकरे म्हणाले,आता त्यांना पदं मिळाली आहेत.पण ज्यावेळी त्यांचा वापर संपेल,तेव्हा त्यांना कचराकुंडीत फेकून देण्यात येईल. तेव्हा मग कपाळावर हात बडवत तुम्हाला ते याच ठाण्यात दिसतील. अनंत तरेंचं तेव्हाच ऐकायला हवं होतं. आता मला पश्चाताप होतोय.तेव्हा तरेंचं ऐकलं असतं, तर शाहांसमोर हंबरडा फोडणारे बघायला मिळाले नसते, अशी टीकेची तोफ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) डागली.
शिवसेनेचे नेते अनंत तरे यांच्या आयुष्यावर योगेश कोळी यांनी लिहिलेल्या 'अनंत आकाश' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनंत तरे यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तरेंनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं होतं. त्यावेळी तरेंनी शिंदेंना आवरा असं उद्धवजींना सांगितल्याचं म्हटलं होतं. तसंच शिंदेंना आवरलं गेलं नाही, तर हा दुसरा नारायण राणे होईल,अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
ठाकरे म्हणाले, मला पाश्चाताप आता होत आहे, तेव्हा अनंत तरे यांचे ऐकले असते, तर अमित शाह समोर वाचवा म्हणून घालीन लोटांगण घालणारे दिसले नसते. भाजपने जेव्हा 2014 ला अचानक साथ सोडली, तेव्हा अनंत तरे हे ऐकायला तयार नव्हते.त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली होती. मी त्यांना त्यावेळी मातोश्रीवर बोलावून भाजप आपल्याला संपवायला निघाला आहे, आधी त्यांना रोखू. मग आपण पुढे जाऊ असं सांगितलं होतं. पण तेव्हा तरे यांनी मला हा माणूस पुढे गद्दारी करणार असं सांगितलं होतं, आणि पुढे तेच झालं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तेव्हाचे ठाणे आनंद देणारे ठाणे होते आताचे ठाणे कॉन्ट्रॅक्टरचे ठाणे झाले आहे. पण निष्ठेचे मुखवटे घातलेले लोक आपल्या बाजूला बसतात अशी जहाल टीकाही ठाकरे यांनी केली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात आपल्यात अनंत तरेंसारखे राजहंस असते, तर कावळे फडफडले नसते असा टोलाही लगावला.
अनंत तरे यांनी त्यावेळी माझी नाराजी उद्धवजींवर नसून एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यांना पाहून मी उद्धवजींना सांगितलंय की, याला आवरा. या शिंदेला आवरा. नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल. हा फक्त आपले आपले निवडतो. बाकी सगळ्यांना कामाला लावत असल्याची उद्विग्न भावना तरे यांनी व्यक्त केली होती.
आपण जेव्हा रायगड लोकसभा लढवली, तेव्हा शिंदे नगरसेवक पण नव्हते असंही तरे यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांनी आता सगळे निर्णय ते एकटेच घेतात अशी टीका त्यांनी शिंदेंवर केली होती. या संघटनेतील निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातोश्रीला आहे. आधी तो माननीय बाळासाहेबांना होता, आता तो अधिकार उद्धवजींना आहे. आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो,तर या संघटनेचे तुकडे तुकडे होणार अशी मोठी भीती तरेंनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.