KDMC News : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेसह विविध पदांवर कार्यरत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाकरेंच्या शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत केणे, शाखाप्रमुख संभाजी सावंत, उपशाखाप्रमुख विनोद चव्हाण, हेमंत जाधव यांच्यासह बाळाराम गायकवाड, आशुतोष देशमुख, धनंजय कुलकर्णी, राज शेडगे, शुभम पाटील, रुपेश राणे आणि रवींद्र जाधव यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शेकडो कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाला संघटनात्मक पातळीवर फटका बसल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रवेशानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विकासाचे राजकारण पुढे नेत आहे. कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण मतदारसंघात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. विकासाच्या या प्रवाहावर विश्वास ठेवून कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल,” असे शिंदे यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात आणखी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामुळे कल्याण पूर्वेतील ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
या वेळी नगरसेवक मधुर म्हात्रे, चंद्रशेखर एकनाथ म्हात्रे, किरण निचाळ, उपशहरप्रमुख प्रशांत बोटे, उपशहर अधिकारी तेजस देवकते, रोहित राजपूत, शाखाप्रमुख रितेश राजपूत, निलेश म्हात्रे, राकेश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.