Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News Updates
Bala Nandgaonkar News, Shivsena Latest News in Marathi, MNS News Updates Sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंनी मनसेचा गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न केला

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यात शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत वाद विकोपाला गेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी मंत्री बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीतील किस्सा एका मुलाखतीत ऐकविला. यात त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा कसा केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला हे सांगितले. ( Uddhav Thackeray tried to cut MNS's throat with sweet talk )

बाळा नांदगावकर म्हणाले, मला आजही ती तारीख आठवते. 23 सप्टेंबर 2014ला उद्धव ठाकरे यांचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन आला. ते म्हणाले, आपल्याला दोघांना भेटायला पाहिजे. एकत्र बोलायला पाहिजे, असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरे यांनी मला बोलावून घेतले. मला घडलेले संभाषण सांगितले. मला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे जायला सांगितले. त्यानुसार मी शिरीष सावंत यांना बोलावले. आणि काही मंडळींसह राजगडवर आम्ही एकत्रित बसून जागा वाटपा विषयी मसुदा तयार केला. मी रात्रभर जागा होतो.

त्यांनी पुढे सांगितले की, 24 सप्टेंबर 2014ला सकाळी बाजीराव दांगट, देशमुख साहेब व राज ठाकरे यांच्यात पुन्हा चर्चा झाली. मी त्या रुमच्या बाहेर बसलो होतो. ते दोघे शिवसेनेकडून निरोप घेऊन आले होते. मी म्हंटलो राज साहेब तुम्ही तुमच्या मोठ्या भावाशी बोलून घ्या. त्यानुसार राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंशी बोलले. त्यानुसार चर्चा झाली. उद्धव ठाकरे म्हणाले माझ्याकडून अनिल देसाई बोलतील. राज ठाकरे म्हणाले आमच्याकडून बाळा नांदगावकर बोलतील. दोघांनीही सहमती दर्शविली. 26 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

मी अनिल देसाईंना फोन केला. त्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून सांगतो असे सांगितले. 25 सप्टेंबरला मी देसाईंना फोन केला तर ते म्हणाले बोलतो, सांगतो तुम्हाला. 25 तारखेला राज ठाकरेंनी मला बोलावून घेतले. आमचे उमेदवारांना देण्यासाठी एबी फॉर्म तयार होते. सर्व एबी फॉर्मवर माझ्या सह्या होत्या. महाराष्ट्रभरातील उमेदवार फॉर्मची वाट पाहत होते. राज ठाकरे म्हणाले काय झाले. मी म्हणालो देसाई म्हणालेत भेटतो बोलतो पण अजून काहीच नाही,असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरेंनी एबी फॉर्म वाटप करण्यास मला सांगितले. मात्र मी तसे केले नाही. देसाईंच्या निरोपाची वाट पाहिली. एबी फॉर्म थांबविले.

मी 25 तारखेला संध्याकाळी फोन केला तर तो फोन खासदार राजन विचारे यांनी उचलला. त्यांनी देसाईंना फोन दिला. मी देसाईंना म्हणालो, तुम्हाला युती करायची असेल तर तसे सांगा. प्रस्ताव तुमच्याकडून आला आहे. तुम्ही हो अथवा नाही सांगितले तर मला बरे पडेल. आमची व भाजपची युती होईल म्हणून तुम्ही झुलवत ठेवत असेल तर तसे सांगा, असे स्पष्ट केले. त्यावर देसाईं म्हणाले, नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, असे त्यांनी सांगितले. ही सर्वबाब मी राज ठाकरेंना सांगितली. त्यानुसार राज ठाकरेंनी एबी फॉर्म वाटायला सांगितले. मग सर्व एबी फॉर्म वाटले गेले.

त्यावेळी मी निवडणूक लढवायची अथवा नाही हे स्पष्ट नव्हते. मात्र राज ठाकरेंनी मला निवडणूक लढवायला सांगितले. माझ्या एकट्याच्या एबी फॉर्मवर राज ठाकरेंची सही होती. आम्ही 26 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म भरले. आम्हाला या बाबीचे वाईट वाटले. याचा अर्थ आम्ही भाजप बरोबर जाऊ नये यासाठी खेळलेले ते राजकारण होते. एवढे न कळायला आम्ही काय दूधखुळे होतो. त्यांनी गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही नांदगावकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT