Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : ''तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता...'' उद्धव ठाकरेंचा थेट इशारा!

Uddhav Thackeray in Mumbra : 'किराए का टटू कभी रेस का घोडा नही बन सकता,'' असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Mumbra News : मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरून आज ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे हे नेते आणि पदाधिकाऱ्यांसह मुंब्र्यातील संबंधित शाखेच्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र, त्या ठिकाणी शिंदे गटाचेही शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय पोलिसांचाही दांडगाडा बंदोबस्त होता. अखेर उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी आयोजित छोटेखानी सभेला संबोंधित करत, प्रशासनाला इशारा देत तिथून परत जाणे उचित समजले. या वेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे म्हणाले, ''मला माहीत आहे की आज खूप वर्षांनंतर मी मुंब्रामध्ये आलो आहे. आजपर्यंत कधी आपली तशी दोस्ती झाली नव्हती. एक गैरसमज नक्कीच होता, परंतु आज सर्वांनी पाहिलं आहे, की आम्ही कारभार कसा केला. आता जे घडतंय ते तुम्हाला सहन होतंय का, मान्य आहे का? केवळ तुम्हीच नाही तुमचा संपूर्ण परिवार आणि तुमच्या मुलांचं भवितव्य या चोरांच्या हाती तुम्हाला द्यायचं आहे का?''

याशिवाय ''तर आता तुम्ही एक निश्चय करा, निवडणूक कोणतीही येऊ द्या. जो गद्दार इकडे दिसतोय, त्याने काय काय फोटो लावले आहेत, या गद्दारचं डिपॉझिट महापालिकेपासून ते लोकसभेपर्यंत, मग लोकसभेत कोणीही असेल, त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला घरी पाठवलं पाहिजे. आता हे गद्दार काही दिवसांचेच पाहुणे आहेत.

या नेभळटांना कोणीही थारा देता कामा नये. मला पाहायचं होतं, की मी तर लढण्यास तयार आहे, मी मैदानात उतरलो आहे. परंतु मी ज्यांच्यासाठी लढतोय किती लोक माझ्यासोबत येतील? तिकडे जे लोक जमले आहेत ते सगळे भाडोत्री आहेत. 'किराए का टटू कभी रेस का घोडा नही बन सकता,'' असंही या वेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, ''प्रशासनाला मी ताकीद देतोय, होय ताकीद देतोय. की तुम्ही या चोरांचे गुलाम नाही आहात. पोलिसांनासुद्धा सांगतोय की, तुम्ही आज त्या चोरांचं रक्षण केलेलं आहे. पण त्या चोरांना एवढच सांगेन, तुम्ही मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारलेला आहे. आता या मधमाश्या कुठे कुठे तुम्हाला डसतील त्या तुमचं तुम्ही बघा,'' असा थेट इशारा या वेळी उद्धव ठाकरेंनी दिला.

तसेच, ''महापालिका आयुक्तांनाही सांगतोय, ते जे काय खोकं आहे. त्या खोक्यात तुम्हीही गेला असाल मला कल्पना नाही. पण आमच्या जागेवर तुम्ही जे डबडं उभारलं आहे ते डबडं तुम्ही ताबडतोब हटवा, नाहीतर तोपर्यंत आम्ही तिकडे येऊन बसणार म्हणजे बसणार. आजपासून नाही तर उद्यापासून माझे शिवसेनेचे जे शाखाप्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत. ते तिकडे जाऊन बसतील, चौकात बसतील. सर्व लोकांनी सोबत राहायला हवं. संपूर्ण मुंब्रा त्यांच्यासोबत असायला हवा.

जेव्हा आपली लोकं तिथे बसतील, तेव्हा तिकडे फिरकण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. जनतेच्या सेवेसाठी जी आपली शाखा सुरू होती, ती शाखाही त्याच जागेवर यापुढेही सुरूच राहील आणि त्यापेक्षाही मोठ्या शाखेचं आम्ही पुनर्निर्माण करू.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT