Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mumbai Mayor Election: उद्धव ठाकरेंची मुंबईतील सत्तासंघर्षातून माघार, महापौरपदाचा हट्टही सोडला? बड्या नेत्यानेच दिले संकेत

BMC Election News: एकीकडे मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर मुंबई महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच होईल असं म्हणत आपण अजूनही रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर सत्तास्थापनेच्या खेळातून माघार घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शक्य ते सारे डाव टाकल्यानंतरही माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सत्ता राखण्यात अपयश आलं. भाजप बीएमसीच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला.तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे युतीनं 71 जागा मिळवल्या होत्या.युतीत निवडणूक लढवल्यानंतर भाजप एकनाथ शिंदेंसोबतच महापालिकेत सत्तास्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात होतं.

पण याचदरम्यान,उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल असं विधान करत निकालानंतरही आपण अजून सत्तेच्या खेळात असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यांच्या विधानानंतर मुंबईत राजकारण फिरणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली होती. अशातच आता उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून माघार घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.ते म्हणाले,काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटणार नाही.फोडाफोडीचा खेळ हा फक्त भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्येच होणार आहे. कारण आमचे नगरसेवक हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक ही मातोश्रीवरच होते असं स्पष्ट संकेत देत एकप्रकारे मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं माघार घेतल्याचंच राऊतांच्या बोलण्यातून समोर येत आहे.

तसेच खासदार संजय राऊतांनी यावेळी एकनाथ शिंदे हे भाजपचे लोहपुरुष आहेत त्यांनी शिवसेना फोडली, त्यांना अमित शाह दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात,त्यामुळे ते काहीही करू शकतात अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे. शिंदे भाजपचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

यावेळी त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावरही कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, कल्याण डोंबिवलीचा हा विषय अत्यंत चिंताजनक आहे. हा केवळ स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे असे म्हणून चालणार नसल्याचंही त्यांनी ठणकावलं.

याचदरम्यान, संजय राऊतांनी यावेळी एखादे स्थानिक नेतृत्व पक्षाच्या मूळ ध्येयधोरणांच्या विरोधात जाऊन काम करत असेल,तर पक्षनेतृत्वानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणं गरजेचं असल्याचं सडेतोड मतही व्यक्त केलं. तसेच भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या आपल्या 12 नगरसेवकांना काँग्रेसनं जसं पक्षाबाहेर काढलं, तसाच कठोर निर्णय इथेही अपेक्षित असल्याचं राऊतांनी म्हटलं.

कल्याण डोंबिवलीतील मनसेनं घेतलेल्या भूमिकेबाबत संजय राऊत यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या गटाला मदत करणाऱ्यांवर पक्षनेतृत्वानं तातडीने कारवाई करून,आपण या भूमिकेशी सहमत नाही हे स्पष्ट करायला हवं असंही संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी चर्चा झाल्याचं म्हटलं. अशा प्रवृत्तींबाबत राज ठाकरेंनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, शिंदे गट हा मराठी माणसांमधील एमआयएम असून तो बेईमान आणि महाराष्ट्रद्रोही आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राशी गद्दारी केली, त्यांच्याशी कोणतेही राजकीय संबंध ठेवता कामा नयेत. अशा गद्दारांना साथ देणारे लोक देखील त्याच विशेषणांना पात्र ठरतात,असा घणाघाती आरोपही राऊतांनी केला.

एकीकडे मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर मुंबई महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच होईल असं म्हणत आपण अजूनही रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर सत्तास्थापनेच्या खेळातून माघार घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच फडणवीसांनीही वरच्या देवाच्या मनात मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचाच होईल असं स्पष्ट केलं होतं.

यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करतानाच त्यांच्या शिवसेनेचीही भूमिका स्पष्ट केल्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याचंच बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT