Sanjay Gaikwad News Sarkarnama
मुंबई

Sanjay Gaikwad News : " उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या हत्येचा कट..."; आमदार गायकवाडांचा खळबळजनक दावा

अतुल मेहेरे

Mumbai News : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, तेव्हापासून ते आजतागायत शिंदे गट आणि ठाकरे गटात दिवसागणिक आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. याचवेळी शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करतानाच मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना 'मातोश्री'वरून तत्कालीन नगरविकासमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बुधवारी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी आमदार गायकवाड म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. शिंदे यांना ठार मारण्यासाठी नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती.

या धमकीनंतर तेव्हाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होणार होता. अशातच 'मातोश्री'वरून फोन आला शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली, असा दावा आमदार गायकवाड यांनी केला. आपण अत्यंत जबाबदारीने हे विधान करीत असल्याचेही आमदार गायकवाड या वेळी म्हणाले.

मुळात नक्षलवाद्यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा ‘गेम’ करण्याचा डाव होता, असे खळबळ उडवून देणारे विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले. शिवसेनेमध्ये एकजूटता असताना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray),आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही मतभेद होते. मात्र, हे मतभेद इतक्या स्तरापर्यंत जातील, याची कल्पनाही केली नव्हती, असे आमदार संजय गायकवाड यांनी नमूद केले.

गडचिरोलीमध्ये एकनाथ शिंदे दौऱ्यावर असताना ते नक्षलवाद्यांना सापडतील, अशी व्यूहरचना करण्यात आली होती का, असा सवालही आमदार गायकवाड यांनी उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप लावला आहे. आमदार गायकवाड यांच्या या आरोपानंतर अद्याप ठाकरे गटाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या गौप्यस्फोटामुळे 'मातोश्री' आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद किती विकोपाला गेले होते, याचा एकूणच अंदाज येतो.

आमदार गायकवाड यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजप नेते तथा तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत पेनड्राइव्हमधील पुराव्यांसह अनेक गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारवर केले होते.

आपल्याला फसवण्यासाठी कसे खोटे षडयंत्र रचले जात आहे, याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर आता आमदार गायकवाड यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गटातला वाद तापण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT