Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे अमित शाहांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले...

Thackeray vs BJP : मो गँबो खूश हुआ, असं म्हणत ठाकरेंचा शाह यांच्यावर घणाघात

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगावमध्ये उत्तर भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. तसेच येत्या काळात सत्ता आली तर तुम्हालाही (उत्तर भारतीय) काहीतरी देऊ. पण आमच्याबरोबर या, आमच्याबरोबर राहा, असं आवाहन केलं. तसेच मो गँबो खूश हुआ, असं म्हणत त्यांनी शाह यांच्यावरही जहरी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''माझा धनुष्यबाण चोरीला गेला. पण ज्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांना मी आव्हान दिलंय निवडणुका घ्या आणि मैदानात या. मग जनता काय ते निर्णय घेईल तो मान्य असेल. मी भाजपला सोडले मात्र, हिंदुत्व सोडलेले नाही. काल कोणीतरी पुण्यात आलं होतं. यावेळी त्यांना कोणीतरी सांगितलं की, धनुष्यबाण शिंदेंना मिळाले. त्यावर मो गँबो खूश हुआ'', असं म्हणत ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर घणाघात केला.

''शिवसेना फोडून शिवसैनिकांमध्ये भांडण लावण्याचे काम सध्या काही शक्ती करत आहेत. मी काँग्रेसबरोबर गेलो नाही तर मला भाजपने काँग्रेसबरोबर जाण्यास भाग पाडलं. मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं, मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवणार. आणि मी ते वचन पूर्ण करण्याचे काम केले. मग मी कुठे चुकलो? मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कधी भेदभाव केला नाही'', असं ते म्हणाले.

''मी आजही आव्हान देतो की, लढायचे तर समोर या मग लढू. जनता हेच मोठे न्यायालय आहे ते ठरवतील. पण सध्या लबाड लांडग्या सारखे केंद्रीय यंत्रणा मागे लावण्याचे काम सुरू आहे. पण काही झालं तरी माझं काम आहे त्यांच्यापासून मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला वाचवायचे आणि ते मी करणार.''

''सध्या हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून राज्यात मोठे मोर्चे काढले जात आहेत. पण जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती देशाची पंतप्रधान आहे. मग तरीही हिंदुत्व धोक्यात कसं? पण हे सर्व हिंदुच्या डोळ्यात माती फेकण्याचे काम सुरू आहे. मी भाजपला सोडलं असलं तरी हिंदुत्व सोडलेलं नाही. काल कोणतरी म्हटलं की मुख्यमंत्री पदासाठी तळवे चाटले. मग आता काय काय सुरू आहे'', असं म्हणत त्यांनी शिंदेंवर जहरी टीका केली.

''माझ्या घरावर कब्जा करण्याचं काम सुरू आहे. चोराला मालक व्हायचे आहे. यांना आमचा बाप पाहीजे, पण त्यांचा मुलगा नको. ज्यांनी धोका दिला त्यांच्याबरोबर आता जमतं का? बाळासाहेबांनी ज्यांना मोठं केलं आता त्यांनाच मालक व्हायचंय'', असा घणाघात ठाकरेंनी यावेळी शिंदेंवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT