corporators Ulhasnagar Guwahati tour controversy  sarkarnama
मुंबई

Guwahati Tour Controversy : नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादात; प्रशिक्षण की सहल? नातेवाईकही सोबत! 65 लाख...

Corporators Ulhasnagar Guwahati tour controversy : नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली असताना हा दौऱ्या का आयोजित केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

शर्मिला वाळुंज

Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या 76 नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असतानाच तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला पाठवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच काही नगरसेवक कुटुंबीयांसह गेल्याच्या दाव्यांमुळे हा अभ्यास दौरा होता की पर्यटन, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.

२२ ते २६ जुलैदरम्यान उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांसाठी आसाममधील गुवाहाटी येथे चार दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे ७६ नगरसेवकांच आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यासाठी सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

प्रत्येक नगरसेवकांसाठी विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमधील निवास, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह सुमारे ७४ हजार ७२० रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक पत्नी, आई, मुले आणि इतर नातेवाईकांसह गुवाहाटीला गेल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे हा प्रशिक्षण दौरा होता की कौटुंबिक सहल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने हा दौरा मुंबईस्थित अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. सभाशास्त्र, प्रशासकीय कामकाज, प्रभाग विकास, नियोजन आणि स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या विविध पैलूंवर प्रशिक्षण देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

सुमारे ७०० कोटी रुपयांच्या आर्थिक ओझ्याखाली असलेल्या महापालिकेने शहरातील प्रलंबित विकासकामे, खड्डेमय रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करून एवढा खर्च का केला, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

काँग्रेसने घेतला आक्षेप

काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनीही या खर्चावर आक्षेप घेत, शहराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ६५ लाखांचा खर्च मंजूर करण्यापूर्वी प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा होता, असे सांगितले. या खर्चाची संपूर्ण माहिती मागवून त्याबाबत जाब विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

महापौरांनी आरोप फेटाळले

महापौर अश्विनी निकम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या, हा दौरा केवळ नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित अधिकृत प्रशिक्षण कार्यक्रम होता. उल्हासनगरच्या ७६ पैकी ६१ नगरसेवकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. महापालिकेने केवळ नगरसेवकांचा खर्च दिला असून, त्यांच्यासोबत गेलेले नातेवाईक स्वखर्चाने गेले होते. लोकांच्या समस्या कशा सोडवायच्या, सभागृहाचे कामकाज कसे चालवायचे यासह विविध विषयांवर प्रशिक्षण झाले. महापौर म्हणून स्वतःसाठीही स्वतंत्र प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते,अशी माहिती त्यांनी दिली.

मनसेकडून चौकशीची मागणी

मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख म्हणाले, महापालिकेवर ७०० कोटी रुपयांचे कर्ज असताना आणि शहरातील रस्ते, खड्डे व इतर समस्या कायम असताना नागरिकांच्या कराच्या पैशातून प्रशिक्षणाच्या नावाखाली सहल काढली जात आहे. प्रति नगरसेवक खर्च आणि मंजूर झालेल्या एकूण रकमेतील तफावतही संशयास्पद आहे. हा खर्च ६५ लाख नसून दीड कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. नगरसेवकांसोबत गेलेल्या नातेवाईकांचा खर्च नेमका कुणी केला, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT